कल्याण - Prakash Ambedkar on Muslim ( Marathi News ) काही पक्ष तुम्हाला मर्यादेपर्यंत साथ देतील पण १०० टक्के साथ हवी असेल तर एक मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणच्या सभेत केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उबाठा सेना मुस्लिमांना उमेदवारी देणार नाही, नेतृत्व देणार नाही, पण मुस्लिमांची मते घेऊन त्यानंतर पुढे काहीही करतील. NRC आणि CAA हे संविधानाच्या विरोधात असून त्याविरोधात आवाज उचला. भाजपाला हरवायचं यात दुमत नाही मग तुम्ही ठरवलं तर मोहम्मद शहाबुद्दीनही हरवू शकतात. निवडून आल्यानंतर तुमच्याशी प्रामाणिक राहील याची गॅरंटी नाही त्याच्यावर विश्वास का ठेवायचा?, आगीशी का खेळताय, आम्ही तुम्हाला आधीच सूचित करतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच जोपर्यंत तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान द्यायला शिकणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे नेतृत्व मागू शकत नाही. मुस्लीम उमेदवार असून तुम्ही मतदान का केले नाही याचे उत्तर तुम्हाला पुढे द्यावे लागेल. मुस्लिमांना मत देणार नाही अशी परिस्थिती मुस्लीम मतदारांनी करू नये. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारू नका. जर तुम्ही मोहम्मद शहाबुद्दीन यांना मतदान केले नाही तर तुम्ही मुस्लीम उमेदवार नसतानाही आम्हाला मते मिळू शकतात असं त्यांना वाटेल. माझं मुस्लीम मतदारांना आवाहन आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, या देशाला मोदी हिंदूराष्ट्र करायला निघालेत. मात्र याच मोदींच्या काळात २०१४ ते राज्यसभेत प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत १७ लाख कुटुंबाने फक्त देश सोडला नाही तर नागरिकत्व सोडले. वसुलीचं राज्य सुरू होते. जेलमध्ये टाका, आयकर खात्यात अडकवा. या कारवायातून हे लोक भारतीय नागरिकत्व सोडून बाहेर गेले. १७ लाख कुटुंबाला देशातून घालवणारा भाजपा चालतो का? हे सरकार कुणाच्या विरोधात होते, तर १७ लाख कुटुंब ज्यांनी देश सोडला ते हिंदूच होते. या कुटुंबावर धाडी टाकणार होता, ईडीच्या नोटीस देणार होतात. जर त्यांनी देणगी दिली नाही तर त्यांना अडचणीत आणणार होते. या देशाचा आर्थिक कणा मजबूत ठेवायचा असेल तर भाजपाविरोधात मतदान केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.