मुंबई : राज्यातील शासकीय नोकरभरतीतील गोंधळामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त असताना आता निवडणुकांमुळे भरतीचे घोडे अडले आहे.
लोकसभा निवडणुकांमुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा सरकारने पुढे ढकलल्या, तर अनेक विभागांतील विविध पदांच्या भरती परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत, मात्र, त्याचे निकालच लागले नाहीत. त्यात अनेक दिवस निघून जात असल्याने विद्यार्थ्यांची वयोमर्यादाही ओलांडली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या प्रचंड संताप दिसून येत आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा १६ जून रोजी नियोजित होती. मात्र, त्याच दिवशी यूपीएससीची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे. पुढे विधानसभेची आचारसंहिता लक्षात घेता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.
पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा२८ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा अचानक महिनाभरापूर्वी पुढे ढकलण्यात आली, नवीन तारीख अजून जाहीर नाही. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटीची संधी असल्यामुळे यात किमान एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत. जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. समाजकल्याण अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी ही परीक्षा १९ मे रोजी नियोजित होती. तीही पुढे ढकलली आली.
विद्यार्थ्यांचा एक एक दिवस महत्त्वाचा असताना परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत; पण सरकार गंभीर नसल्याचे दिसत आहे. प्रचार करण्यासाठी, मतदान करण्यासाठी यांना विद्यार्थी हवेत म्हणून परीक्षा पुढे ढकलल्या, अशी शंका निर्माण होत आहे. - महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
निकाल प्रलंबित असलेली परीक्षालोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट क लिपिक-टंकलेखक २०२३ मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला झाली. चार महिने होऊनही या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याबाबत आयोगाकडून कोणतीही स्पष्टता नाही.