अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:07 PM2024-06-06T21:07:30+5:302024-06-06T21:08:02+5:30
Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील आमदारांमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळत आहे. त्यात महायुतीच्या पराभवानंतर अजित पवारांच्या काही आमदारांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याची माहिती आहे.
मुंबई - लोकसभेचा निकाल लागताच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्यात. राज्यात ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिला आहे. त्यात अजित पवारांच्या वाट्याला केवळ १ जागाच आली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला ५ आमदारांनी दांडी मारल्याचं पुढे आले. त्यात अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदारांच्या गैरहजेरीवरून विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. ट्रायडेंट हॉटेलला ही बैठक पार पडली. त्याआधी अजित पवारांनी कोअर कमिटी सदस्यांसोबतही चर्चा केली.
अजित पवारांचे अनेक आमदार शरद पवारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या राजकीय उलथापालथी घडू शकतात. सध्या तरी महाराष्ट्रात शिंदे सरकारवर कुठलेही संकट नाही. मात्र आमदारांच्या भूमिकेनंतर हालचाली दिसून येऊ शकतात. पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल मविआच्या बाजूने झुकलेले आहेत. मविआत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वात कमी १० जागा लढवल्या त्यात १० पैकी ८ जागांवर दणक्यात विजय मिळवला आहे.
बारामतीच्या पराभवामुळे अजित पवार गटात खळबळ
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या राहिल्या होत्या. सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा या दृष्टीने महायुतीने ताकद लावली. परंतु प्रत्यक्षात सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात चौथ्यांदा खासदार झाल्या त्यामुळे बारामतीतील सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १८ ते १९ आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरंच हे आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का?" असा प्रश्न पत्रकारांकडून जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले की, "रोहित पवार यांना काही बाहेरचे आमदार संपर्क करत असतील. मात्र या विषयावर मला लगेच काही बोलायचं नाही. या आमदारांबाबत मी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती देईल. तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही काही करणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.