मुंबई - Shrikant Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) मंत्री कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. परंतु मला जर त्यांनी विचारलं, तुला मंत्री व्हायचंय का? तर मी सरळ सरळ मला मंत्री होण्यास बिल्कुल रस नाही. मला पक्ष संघटना, पक्षाचे काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यास जास्त रस आहे. पक्ष कसा वाढेल यासाठी मला काम करायचं आहे अशी भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, माझ्यावर गटनेत्याची जबाबदारी दिली आहे. आमच्या पक्षात मेरिटनुसार मंत्री बनवलं जाईल. एकनाथ शिंदे ज्यांना सांगतील ते मंत्री होतील. मला पक्षाचं, संघटनेचं काम तळागाळात घेऊन जाण्यास रस आहे. पक्षासाठी पक्ष बांधणी, ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी काम करायचे आहे. मला तिसऱ्यांदा लोकांनी खासदार बनवलं. मी खूप समाधानी आहे. २७ व्या वर्षी मी पहिल्यांदा खासदार बनलो. मतदारसंघासाठी चांगले काम करत राहीन असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मेरिटनुसार कुणाला मंत्री करायचे याचा निर्णय घेतील. पक्षात वेगवेगळे नेते, खासदार आहेत. ज्यांचा अनुभव आहे. ज्यांनी पक्षासाठी खूप वर्ष काम केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील असंही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या २ वर्षांमध्ये शिवसेनेला मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. जी १९ टक्क्यांची व्होटबँक शिवसेनेची होती त्यातील १४.५० टक्के मतदान आमच्या बाजूने आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्या वाट्याला केवळ साडे चार टक्के मतदान आलं. येणाऱ्या काळात ते साडे चार टक्के मतदानही आमच्या बाजूला येईल. त्यासाठी आगामी विधानसभेला आम्ही पूर्ण ताकदीने काम करू असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा मूळ मतदार आमच्यासोबत राहिला
राज्यात सरकार बनलं तेव्हापासून हे सरकार पडणार अशी स्वप्ने काहींना पडतात. मुंगेरीलाल के हसीन सपने हे आपण ऐकलं आहे. त्या स्वप्नात त्यांना जगू द्या. आज त्यांची काय परिस्थिती झाली आहे. आज त्यांच्या ज्या जागा जिंकून आल्या त्या कुणाच्या व्होटबँकमुळे जिंकून आल्या याचं आत्मपरिक्षण केले तर येणाऱ्या काळात त्यांची काय स्थिती होईल याची जाणीव झाली पाहिजे आणि नाही झाली तर उद्याच्या विधानसभेत आजसारखी परिस्थिती होईल. व्होटबँक पॉलिटिक्समध्ये लोकांची दिशाभूल त्यांनी केली. जे मूळ मतदार शिवसेनेचे होते ते आमच्यासोबत राहिले. मराठी माणूस हा शिवसेनेसोबत उभा राहिला आहे. ज्या जागा पडल्या, त्याठिकाणी कुठल्या भागातून या लोकांना मतदान झाले त्याचे आत्मपरिक्षण या लोकांनी केले पाहिजे असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला.