मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात भाजपाचं मिशन ४५ प्लसचं स्वप्न भंगलं. महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं त्यात भाजपाला २३ जागांवरून आता अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला. राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत राज्यातील भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या निवडणुकी लोकसभा निकाल आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यावर चर्चा होणार आहे.
भाजपातील केंद्रीय नेतृत्वासोबत ही बैठक पार पडणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही चर्चा होईल. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उद्या दिल्लीला जातील. त्याठिकाणी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात बैठक होईल. नुकतेच महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली त्याचसोबत मला सरकारमधून मुक्त करावं अशी मागणी वरिष्ठांकडे केली. फडणवीसांच्या या निर्णयावर भाजपा नेतृत्व उद्या विचारमंथन करेल. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहतील.
याआधीही लोकसभा निकालावर मागील शुक्रवारी प्रदेश भाजपाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रक्षा खडसे, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत सर्वात आधी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले त्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीवर चर्चा करण्यात आली.
विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा फटका
राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात विरोधकांना यश आलं, संविधान बदललं जाणार असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. पहिल्या तीन टप्प्यात हा प्रचार अधिक झाला, त्यामुळे या टप्प्यातील २४ जागांपैकी केवळ ४ जागाच आम्हाला जिंकता आल्या. मात्र उर्वरित टप्प्यात विरोधकांच्या या खोट्या नॅरेटिव्हला रोखण्यात महायुतीला यश आलं, त्यामुळे त्यानंतरच्या २४ जागांपैकी १३ जागांवर महायुती विजयी झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे.