शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:52 AM2024-05-07T08:52:12+5:302024-05-07T08:53:16+5:30
Baramati Loksabha Election - वडीलधारी काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात, स्वार्थासाठी स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या शरद पवार यांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? असा निशाणा रोहित पवारांनी अजित पवारांवर साधला आहे.
बारामती - Rohit Pawar on Ajit Pawar ( Marathi News ) मतदारसंघात अटीतटीचा सामना नाही. जनशक्तीविरुद्ध धनशक्ती लढाई आहे. धनशक्ती ही अजितदादांकडे आहे. मलिदा गँग, लाभार्थी, अहंकार आणि मी पणा आहे. शरद पवारांकडे विचार, सामान्य नागरिक, स्वाभिमान आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ही लढाई विचारांची असून शरद पवार आणि भाजपात लढाई आहे. या निवडणुकीत जनशक्तीचा विजय होईल असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.
बारामती येथे रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. अजित पवारांचे मावळचे आमदार, त्यांच्या कार्यकर्त्यांचा फोटो माझ्याकडे आहे. मग ते थोडे बघावे, ज्या कार्यकर्त्याने मडकं फोडलं त्यालाच अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरत होते. तुम्ही खोटे बोलताय हे सिद्ध झालंय. तुमच्या विचाराने चालणारे जे कारखाने आहेत, त्यांच्यावर ईडी, सीबीआयनं कारवाई केली होती. त्या कारखान्याचे कर्मचारी व्हिडिओत पैसे वाटताना दिसतायेत. त्यामुळे आता अजित पवार काही बोलतील त्यावर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच अजितदादा तुम्ही खोटे बोलू नका, तुम्ही धनशक्तीचा किती मोठ्या प्रमाणात वापर केलाय हे लोकांनी पाहिले. माझे उमेदवार निवडून आले नाही तर मिशा काढेन असं अजितदादा म्हणाले होते, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. ४ जूनला सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना मिशा काढण्यासाठी वस्तारा तयार ठेवावा लागेल. कमीत कमी २ ते अडीच लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान, अजित पवार यांना एवढेच सांगा जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा अप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभं राहण्याची इच्छा होती. आप्पासाहेब पवार आणि शरद पवार यांच्या चर्चा झाली त्यावेळी एक युवा म्हणून अजित पवारांना आपण संधी देऊ असं शरद पवार यांचे मत आलं. तिथे माझ्या आजोबांनी मोठे मन दाखवून माघार घेतली. अजित पवारांचा प्रचार माझ्या आजोबांनी सुद्धा केलेला आहे. ते काय बोलतात माझा जन्म झाला होता की नव्हता मला एवढंच सांगायचंय माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या ६५ वर्षीय अजित पवार यांना कळत नाहीत ? वडीलधारी काय असतात संबंध काय असतात नाती काय असतात स्वार्थासाठी स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या शरद पवार यांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? म्हणून तर सामान्य लोक अजित पवार यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहेत असंही रोहित पवारांनी म्हटलं.