बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:11 PM2024-04-17T16:11:12+5:302024-04-17T16:12:06+5:30
घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारविरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता या निवडणुकीत आणखी एक पवार उतरले आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद राम पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शरद पवार असं नावात साधर्म्य असल्याने या उमेदवाराची बारामतीत सध्या भलतीच चर्चा रंगली आहे.
याबाबत शरद राम पवार म्हणाले की, रिक्षावाल्यांच्या समस्या, वाहनचालकांना मिळणारे कमी दर, पुण्यातील वाहतूक कोंडी यासह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझं मूळ गाव धोंडराई, बीड जिल्ह्यात आहे. परंतु गेल्या १५ वर्षापासून मी आंबेगावात राहायला आहे. घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.
तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून आम्ही कोविड काळातही लोकांची सेवा केली आहे. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोकांना सेवा देत होतो. दोन पवारांमधील लढतीत तिसऱ्या पवाराला फायदा होईल. त्याठिकाणी परिवर्तन होईल. माझा प्रचार सुरू झाला आहे. आम्ही ताकदीने यापुढे प्रचाराला लागू. जर आमच्या मागण्या कुणी पूर्ण करत असेल तर नक्की आम्ही त्यांना भेटणार असंही शरद राम पवारांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीकरांचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही शरद राम पवारांना रिंगणात उतरवलं आहे. ताईंना मत दिले तर दादा नाराज, वहिनींना मते दिली तर साहेब नाराज, त्यामुळे या शरद पवारांना मतदान करा कुणी नाराज होणार नाही. या शरद पवारांची परिस्थिती गरीब आहे. यांच्या घरच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. हीच परिस्थिती प्रत्येक रिक्षाचालकाची आहे. त्यामुळे राजकारण हे युद्ध आहे. त्यामुळे कष्टकरी बांधवांचे १६ लाखांचे मतदान आहे ते आमच्या शरद पवाराना मिळेल अशी अपेक्षा बघतोय रिक्षावाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.