मुंबई - Sunil tatkare on BJP ( Marathi News ) २०१९ मध्ये बिगर भाजपाची एकमेव जागा कोकणात माझी आली होती. २०१९ ला विधानसभा निकालानंतर भाजपा आणि शिवसेना दोघांसोबत राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. काँग्रेससोबतही चर्चा सुरू होती त्यातून महाविकास आघाडी आली, पहाटेचा शपथविधी नसून तो सकाळी ८ वाजता झालाय. दिल्लीत आमची चर्चा झाल्यानंतर मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस नेत्यांकडून शरद पवारांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याठिकाणी सगळे नेते होते. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनाला वेदना झाल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा शपथविधी पार पडला असं सुनील तटकरेंनी सांगितले.
सुनील तटकरे म्हणाले की, २०१४ साली विधानसभेचे पूर्ण निकाल यायचे होते, परंतु भाजपा ११५ पर्यंत जाईल हे लक्षात आले, त्यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरलं, यानंतर विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही मदत केली. भाजपाने तेव्हा समर्थन मागितल्याचं ऐकलं नव्हते. त्यानंतर २०१६ मध्ये आम्हाला सांगण्यात आले, आपल्याला भाजपा सरकारमध्ये सहभागी व्हायचंय त्याप्रमाणे चर्चा सुरू झाली. या चर्चेत जागावाटपाचीही चर्चा झाली. पालकमंत्रिपद, खातेवाटप हेदेखील निश्चित झालं, २०१७ मध्ये सरकारमध्ये कधी बसायचं यासाठी दिल्लीत गेलो. शिवसेनेला काढलं जाईल असं शरद पवारांना अपेक्षित होते. परंतु अमित शाहांना त्यास विरोध केला. भाजपाने शिवसेनेला बाहेर काढण्यास नकार दिला. शिवसेना बाहेर गेली तर आम्ही आत येऊ अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय राष्ट्रपती राजवट लागणं, दिल्लीत भाजपासोबत बैठक होणं याबाबत प्रफुल पटेल, अजित पवारांनी खुलासा केलाय. पण यातलं आणखी काही बोलू शकत नाही. काहीजण म्हणतात, अजितदादांना उपमुख्यमंत्रिपद केले ती चूक झाली, पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते तर मविआ सरकार पुढचे १५-२० दिवसही टिकले नसते. गुप्त मतदानात पहिल्याच दिवशी सरकार गेले असते असा दावाही तटकरेंनी केला आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
पंतप्रधानांच्या 'त्या' भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार होते
दरम्यान, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न घेऊन दिल्लीत भेटायला गेले. त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, ८ दिवसांत संजय राऊतांचा मला फोन आला, त्यांना अजितदादांची भेट माझ्यासमावेत हवी होती. संजय राऊतांनी किमान ५-६ वेळा फोन केला, अजित पवारांना ग्रँड हयातमध्ये बोलावलं होते. मी अजितदादांना घेऊन गेलो, तेव्हा एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. सुनील तटकरे, अजित पवार, संजय राऊत, एकनाथ शिंदे-मिलिंद नार्वेकर यांची बैठक झाली. दिल्लीतून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात पुर्नविचार सुरू होता, मविआ सरकारमधून बाहेर पडून त्यांना भाजपासोबत सरकार बनवायचं होते. उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जाण्याचा विचार आला होता. पंतप्रधान भेटीनंतर उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचं होते हे स्वत: संजय राऊतांनी मला आणि अजित पवारांना सांगितले होते असा गौप्यस्फोटही सुनील तटकरेंनी केला.