देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यातील रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी गरिबांना मदतीचा हात हात दिला. त्यांच्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020" (Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020) ने सन्मानित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्र लोकांची सेवा केल्यामुळे लंके यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
निलेश लंके हे अहमदनगरच्या पारनेरचे आमदार असून हे उपक्रमशील आमदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. लंके यांनी लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू लोकांना मोठी मदत केली. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच त्यांनी गरीबांचा मदतीचा हात दिला आहे. नगर-पुणे महामार्गावर त्यांनी अन्नछत्र उभारलं. तब्बल 68 दिवस असलेल्या या अन्नछत्रामध्ये आपल्या गावी परतणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांची भूक भागवण्यात आली. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच अनवाणी पायांनी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांना चप्पल देखील दिली आहे.
आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठाने कोरोनाच्या संकटात एक कोविड सेंटर देखील उभारले. कोविड सेंटरमध्ये लोकांना सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या. या सेंटरमध्ये एक हजार बेड उपलब्ध होते. लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी टीव्ही, मनोरंजनाच्या सोयी-सुविधा कोविड सेंटरमध्ये होते. महिलांसाठीही वेगळे दालन होते. लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करीत आहेत. आमदार निलेश लंके व त्यांचे ट्रस्ट अत्यंत परिश्रमपूर्वक चांगले काम करीत आहेत असं म्हणत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील लंके यांचं कौतुक केलं आहे.
शरद पवार यांनी देखील लंकेंच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. "आमदार साहेब जर तुम्ही दररोज इतकं चांगलं जेवण दिलंत तर लोक घराऐवजी इथेच कोविड सेंटरमध्ये राहणं पसंत करतील" असं पवारांनी म्हटलं होतं. लंके यांनी गरीब कुटुंबीयांनी लाखो रुपयांचं किराणा सामान दिलं आहे. तसेच वेळोवेळी मदत केली आहे. जेव्हा दुसऱ्या राज्यातील मजुरांना आपल्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा लंके यांनी 200 वाहनांच्या मदतीने त्यांना आपल्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली. निलेश लंके यांच्या या कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कार्याचा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020" पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.