लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्याकडे गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. उत्तराखंडमध्ये तो येत आहे. प्रत्येक राज्य समान नागरी कायदा आणण्यामध्ये प्रयत्न करेल, असे संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे. अजून आपण तो आणू शकलो नाही. पण तो आला पाहिजे आणि येईल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केले.
नाना पाटेकर यांनी काश्मीरमध्ये जसा निर्णय घेतला तसा कुटुंब नियाेजनाचा निर्णय आपण का घेत नाही, असे विचारले तेव्हा फडणवीस म्हणाले, भारतीय पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचा विचार करावा लागेल. जे देश लोकसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत. तिथे वेगळे प्रश्न तयार होत आहेत. कुठे तरी सक्ती आणावी लागेल. हे करताना लोकसंख्येचा ढाचा बदलणार नाही किंवा एकतर्फी होणार नाही, याचे भान ठेवावे लागेल. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे, हे माझे व्यक्तिगत मत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाज चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तोच निवडून येतो. स्वच्छ, चांगला उमेदवार दिला तर त्याचे डिपाझिट जप्त होते. यासाठी समाजालाही बदलावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.