- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोणार सरोवर परिसर सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून वर्ल्ड हेरिटेज म्हणून उदयास येण्याची क्षमता ठेवणारे ठिकाण आहे. सरोवर परिसरासह लोणार शहराचाही समन्वयातून विकास करण्याची अवश्यकता आहे, अशा स्वरुपाचा महत्त्वपूर्ण अहवाल भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टने पुरातत्व विभागाला मधल्या काळात दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नंतर कोरोना संसर्गामुळे यासंदर्भातील महत्त्वपूर्ण काम रखडले असल्याचे स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टच्या डॉ. विशाखा कवठेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.देशात सध्या २७ च्या जवळपास सांस्कृतिक हेरिटेज साइट्स आहेत; पण लोणार सरोवर असे ठिकाण आहे की जेथे सांस्कृतिक आणि नैसर्गिक (मिस्कस कल्चर) वर्ल्ड हेरिटेज म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्यासंदर्भानेच प्राथमिकस्तरावर डॉ. विशाखा कवठेकर आणि रमेश भोळे यांनी लोणार सरोवर परिसरास २३ नोव्हेंबर २०१९ आणि २०२० मध्ये भेट देऊन पाहणी केली होती. त्यासंदर्भातील अनुषंगिक ड्राफ्टही पुरातत्व विभागाकडे दिला आहे.दुसरीकडे लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या अनुषंगानेही लोणार सरोवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत असे खंडपीठाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्याचा संदर्भही भोपाळच्या या स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टच्या अधिकाऱ्यांच्या भेटीमागे होता.याव्यतिरिक्त लोणार सरोवरात आठही दिशांना असलेली मंदिरे, शुक्राचार्यांच्या कार्यशाळेचे अवशेष, इजेक्टा ब्लॅंकेट (आघातानंतर उडालेला मलबा) यासह अनेक अन्य बाबींचा अंतर्भाव करता येईल. पण हे काम आव्हानात्मक व दीर्घकालीन आहे.
सरोवर व शहराचा विकास साथसाथ व्हावाकेवळ लोणार सरोवराचाच विकास न करता शहराच्या विकासासही प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्थानिकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा राहील. सरोवराशी असलेले स्थानिकांचे पुरातन नाते, भावनिक बंधही तितकेच महत्त्वाचे आहे. परिणामी उभय बाजूंचा समन्वय साधून येथे संवर्धनाचे काम करण्याची संधी आहे. यावरही मोठे काम होण्याची अवश्यकता असल्याचे डॉ. विशाखा कवठेकर म्हणाल्या.