ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 13 - महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजने अंतर्गत लोणावळा शहराला मंजुर झालेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यातील सभागृहात ई भूमीपुजन पध्दतीने करण्यात आला. 33.49 कोटी रुपयांची ही योजना असून प्रकल्पाचा 85 टक्के निधी शासनाचा व 15 टक्के निधी नगरपरिषदेचा असणार आहे. निधीचा पहिला हप्ता 9 कोटी 39 लाख रुपये शासनाने नगरपरिषदेकडे वर्ग केला असून नगरपरिषदेच्या वाट्याचे 3 कोटी 21 लाख रुपये या निधीतून हे काम सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज राज्यातील 28 महानगरपालिका व नगरपालिकांच्या तब्बल 1622 कोटी रुपयांच्या विकासकामांचे ई भुमीपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ काँन्फरन्स द्वारे नागरिकांशी संवाद साधला. लोणावळा शहरात प्रथमच अशा प्रकारे विकास कामांचे ई भुमीपुजन करण्यात आल्याने हा कार्यक्रम नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच कार्यक्रम स्थळांवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून कार्यक्रमांचे नियोजन केले होते.
यावेळी मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, पाणी पुरवठा समिती सभापती भरत हारपुडे, शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक राजु बच्चे, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, पुजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रकल्प हा 10 एमएलडी क्षमतेचा असून तो पांगोळी येथे उंच डोंगरावर उभारण्यात येणार असल्याने शहराला ग्रँव्हिटीने पाणी मिळणार आहे. तसेच सध्याचा शहरातील प्रकल्प हा देखिल 12 एमएलडीचा असल्याने शहराला दैनंदिन 22 एमएलडी शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. 2040 सालची लोकसंख्या गृहित धरुन हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे.