राजेंद्र दर्डा -लतादीदींच्या परदेशातील पहिल्याच ऐतिहासिक संगीत कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. मार्च १९७४. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या शिक्षणासाठी मी लंडनमध्ये होतो. आम्हा भारतीयांना एक सुखद बातमी मिळाली की, लतादीदी लंडनमध्ये येत आहेत आणि त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम रॉयल अल्बर्ट हॉलच्या प्रख्यात रंगमंचावर होणार आहे. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपला कार्यक्रम व्हावा, हे जगातील कोणत्याही संगीत कलाकाराचे स्वप्न असते. इथे तर साक्षात लतादीदींचे गाणे ऐकायला मिळणार होते; पण या कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करणे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला परवडणारे नव्हते. सुदैवाने एक मार्ग सापडला. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन जाण्यासाठीची तीन दिवसांची हंगामी नोकरीच मी मिळविली. त्यामुळे सलग तीनही दिवस लतादीदींच्या परदेशातील या पहिल्या ऐतिहासिक संगीत कार्यक्रमाचा मला आस्वाद घेता आला.
विशेष म्हणजे या हॉलमध्ये कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. अल्बर्ट हॉल हा त्याकाळी ५००० आसन क्षमतेचा जगातील सर्वोत्तम व प्रतिष्ठित कॉन्सर्ट हॉल होता. या हॉलमध्ये दीदींनी लागोपाठ तीन कार्यक्रम सादर केले. प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार यांनी लतादीदींच्या त्या मैफलीचे प्रास्ताविक केले होते. त्यावेळी दिलीप साब यांनी पंडित नेहरू यांच्या संगीतप्रेमाचा विशेष उल्लेख केला आणि म्हणाले, ‘लता मेरी छोटी बहन है. जिस तरह फुल का कोई रंग नहीं होता, सिर्फ महक होती है... बहते झरने के पानी का कोई वतन नहीं होता... उगते सूरज और मुस्कुराते बच्चे का कोई मजहब नहीं होता... उसी तरह लता मंगेशकर का आवाज ये कुदरत का करिश्मा है...’त्यानंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात लता मंगेशकर यांचे स्टेजवर आगमन झाले होते. मला आठवते, भगवद्गीतेच्या श्लोकाने लतादीदींनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी साधारण वीसेक गाणी त्यांनी गायली असतील. त्यांच्या मधुर स्वरातील प्रत्येक गाणे कार्यक्रमाची उंची वाढवीत गेले. ‘इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा’... त्यानंतर ‘ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया’... ही त्यावेळी दीदींनी गायलेली गाणी, त्यांचे सुंदर स्वर आजही माझ्या कानात रुंजी घालत आहेत. अल्बर्ट हॉलमध्ये मराठी प्रेक्षकसुद्धा आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलतं गं’ हे भावगीत समरसून सादर केले. या कार्यक्रमात इंग्लंडचे कॅबिनेट मंत्री मायकल फूट यांनी लतादीदींचे स्वागत केले होते.आज लतादीदी आपल्यात नाहीत; पण त्यावेळचा रॉयल अल्बर्ट हॉल, दीदी आणि त्यांचा तो संगीताचा कार्यक्रम आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आहे. दीदींनी गायलेले गाणे आठवते... ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे...’(लेखक ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ आहेत.)