तुम्ही जर मुंबई, ठाण्यात रहात असाल तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा मिळणे अधिकच कठिण झाल्याचे लक्षात आले असेल. राज ठाकरेंच्या मनसेचे काही खळखटॅक सुरु नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी रिक्षा तोडफोडीची नवी मोहीम सुरु केलेली नाही तरीही टॅक्सी, रिक्षा का वेळेवर मिळत नाही, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल. डोक्यावर तापत्या ऊन्हात उभे राहून टॅक्सी-रिक्षांची वाट पाहताना जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त टॅक्सी, रिक्षा कुठे गायब झाल्या यी विचारानं तुमचे डोके अधिकच तापलेही असेल.
www.lokmat.com ने गायब झालेल्या टॅक्सी-रिक्षांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. काही चालकांशी संवाद साधला तेव्हा लक्षात आले नोकरदार जसे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेरगावी जातात. आपल्या गावी जातात तसेच टॅक्सी-रिक्षा-टॅक्सीचालक दीर्घ काळासाठी जात असतात. रामनरेश गुप्ता या कांदिवलीच्या रिक्षाचालकाने दिलेली माहिती खूपच धक्कादायक. तो म्हणाला, आमच्या एका स्टॅण्डवर १४३५ रिक्षा आहेत. त्यापैकी सध्या ७०० रिक्षाही धावत नाहीत. त्यांच्या स्टॅण्डवरचे बहुसंख्य रिक्षाचालक लग्नासाठी तर काही इतर काही कामांसाठी गेले आहेत. रिक्षा टॅक्सी चालवणारे मुख्यत्वे उत्तर भारतीय आहेत. मे-जून हे दोन महिने उत्तरप्रदेश-बिहारसाठी लग्नाच्या मुहुर्तांचे. संयुक्त कुटुंबातून आलेल्या या उत्तरभारतीयांना कौटुंबिक कार्यक्रमांना त्यातही लग्नसोहळ्यांना जाणे एकप्रकारे बंधनकारकच असते. जर घरातील कुणी नातेवाईकांच्या लग्नास हजेरी लावली नाही तर ते अपमानास्पद मानले जाते. त्या कुटुंबाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे उत्तरभारतीय परवडो न परवडो लग्नसोहळ्यासाठी उत्तर भारतातील गावी जातातच जातात. आताही तसेच घडले आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सी शोधाल तर मिळत नाही. नेहमीच लवकर न मिळणारी रिक्षा आणखी वेळ खाते आहे. सुभाष ठाकूर या टॅक्सीचालकाच्या मते उत्तरप्रदेशात जाणे सोपे नसते, आधी तिकिटच मिळत नाही. मिळाले तरी ते वेळेत मिळेल असे नाही. त्यात पुन्हा येण्यासाठी लागणारा काही दिवसांचा वेळ लक्षात घेऊन आमची लोकं फुर्सतनेच जातात. एकदा गेले की मग्न लग्नसोहळे, घराची डागडुजी तसेच शेतीचीही काही कामे उरकतात. त्यामुळे किमान महिनाभर तरी फटका बसतो. त्यामुळे आता टॅक्सी-रिक्षा नेहमीप्रमाणे वेळेवर मिळत नसेल तर उगाच डोके तापवू नका. शांत रहा. रागाला सुट्टी दिल्याशिवाय पर्यायच नाही. कारण टॅक्सी-रिक्षाच सुट्टीवर आहेत.