शिरगाव : दारूंब्रे, कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दिवाळी पाडव्यापासून सुरू झाला असून, ऊसतोड करण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून ऊसतोड कामगार कारखाना परिसरात दाखल होत आहेत. काही मुकादम यांनी तर ऐन दिवाळीतच कामगारांना कारखान्यावर आणल्याने या कामगारांना आपली दिवाळी रस्त्यावरच साजरी करण्याची वेळ आली आहे. या वर्षीचा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दिवाळीनंतरच सुरू करण्याचे राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे बहुतांश ऊसतोड कामगारांना या वर्षीची दिवाळी घरी साजरी करता आली. गेल्या अनेक वर्षांपासून या उसतोड कामगारांना दिवाळी उसाच्या फडातच साजरी करावी लागत होती.ऊसतोड कामगारांमध्ये बहुतांश कामगार हे प्रामुख्याने मराठवाडा आणि खानदेशातील आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूर, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, नांदेड आदी जिल्ह्यांतील ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने आहेत. या वर्षी पावसाने या भागात दमदार हजेरी लावल्याने येथील कामगार आपल्या शेतीतील कामे उरकण्याकडे लक्ष देत आहेत. दिवाळीच्या अगोदरच आपल्या शेतात आलेले पीक काढून घेऊन उर्वरित पीक कोणाकडे तरी वाटणीवर सांभाळण्यास देऊन हे कामगार ऊसतोडणीच्या कामावर दाखल होत आहेत. मागील वर्षी दुष्काळात होरपळलेल्या या कामगारांना अधिकाधिक ऊसतोडणी करून जास्तीत जास्त पैसा मिळवून आपली परिस्थिती सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.सध्या कारखाना परिसरात ऊसतोड कामगार बैलगाडी, टायर गाडी, ट्रक, ट्रॅक्टर आदीद्वारे दाखल होत असल्याने कामगारांमुळे परिसर गजबजला आहे. सर्वजण राहण्यासाठी झोपड्या उभारण्याच्या कामात व्यस्त दिसत आहेत. (वार्ताहर)>उत्साह : संसार मांडण्याची धांदल काही कामगार नुकतेच दाखल झाले असून, झोपडी पूर्ण होईपर्यंत त्यांचा संसार हा उघड्यावर मांडून साहित्य ठेवण्याच्या कामाची लगबग दिसत आहे. कारखान्याचे अधिकाऱ्यांनी समजावून घेऊन लवकरात लवकर ऊसतोड चालू करावी.चांगला फड तोडणीसाठी मिळावा अन्यथा आमच्या बैलांचा खाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी मागणी काही कामगारांनी केली. या कामगारांमध्ये ऊसतोडणीबाबत चांगलाच उत्साह असल्याचे दिसत आहे.
ऊसतोड कामगारांची लगबग
By admin | Published: November 03, 2016 1:43 AM