मेहरुन नाकाडे, रत्नागिरीमानवी शरीर महत्त्वाचे आहे. प्रत्येक अवयव हा तेवढाच अनमोल आहे. ज्यावेळी एखादा अवयव निकामी होतो किंवा तो नसतो, त्याचवेळी त्याचे महत्व कळून चुकते. सृष्टीची किमया पाहण्यासाठी मानवाला ‘डोळे’ लाभले आहेत. मात्र, ज्या व्यक्तिना डोळे नाहीत, त्याबाबत आपण कधी विचार केला आहे का? नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सावरू शकते. धकाधकीच्या जीवनात व पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या मंडळींमुळे कित्येकांना अंधारे आयुष्य जगावे लागत आहे. १६.१३ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १९० अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ संकल्पना घेऊन सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला होता. २०१३-१४ मध्ये दोन, तर चालू वर्षात आतापर्यंत दोन अंध व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला आहे. शासनाकडून नेत्रदानाची संकल्पना सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य नागरिक उत्साहात नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून देतात. परंतु संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मात्र त्याच्या कुटुंबातील सदस्य नेत्रदानासाठी आग्रही नसतात. बहुतेक वेळा विरोध करतात. त्यामुळे संकल्प करणारे हजारो असले तरी नेत्रदान करणारी मंडळी मात्र मोजकीच आहे. याबाबत सामाजिक संघटनांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. भारताचा विचार केला तर दहा लोक अंध आहे. कोणी नेत्रदान केले तर त्यांचेही आयुष्यात प्रकाश येणार आहे. दरवर्षी देशात एक कोटी लोक मृत्यू पावतात. मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतले तर दृष्टीची मागणी शिल्लकच राहणार नाही. परंतु तसे होत नसल्यामुळेच हजारो अंध बांधव दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. अपघात तसेच अन्य कारणांमुळे तरूण व्यक्ती अंधत्वाच्या शिकार झाल्याचे दिसते. अपघातात किंवा अन्य कारणांमुळे मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांचे डोळे दान केले गेले तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश येईल. जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत्रदान समुपदेशन गेली तीन वर्षे सुरू आहे. आतापर्यंत केवळ आठ लोकांनाच याचा लाभ मिळाला असला तरी अद्याप १९० अंध दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.
कुणीतरी टाकेल का नजर रत्नागिरीतील १९० अंधांच्या डोळ्यांवर?
By admin | Published: September 22, 2014 2:24 AM