मुंबई : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी लोकलवर फुगे मारतानाच प्रवाशांवर रंग फेकणाऱ्या टवाळखोरांवर आता रेल्वे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)यांच्याकडून टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी विशेष पथक रेल्वे स्थानकांवर नेमण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे आव्हान या दोन दिवसांत रेल्वे पोलिसांसमोर असेल. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर रुळांजवळील झोपड्यांमधून पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात. त्याचप्रमाणे लोकलमधून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहणाऱ्या काही टवाळखोर प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर उभे असणाऱ्या महिला प्रवाशांवर रंगही फेकण्याचे प्रकार केले जातात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या मारल्याने लोकलमधील प्रवासी जखमी झाल्याच्याही घटना याआधी घडल्या आहेत. त्यात काही प्रवाशांना डोळेसुद्धा गमवावे लागले आहेत. हे पाहता यंदाच्या होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी रेल्वे पोलिसांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रुळांजवळील झोपड्यांमधून गेल्या दोन दिवसांपासून यासंदर्भात जनजागृती करतानाच फुगे व पिशव्या लोकलवर फेकताना आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. रेल्वे पोलिसांकडून विशेष पथक नेमतानाच कॅमेरा, मोबाइलमधून चित्रीकरण, स्थानक व मार्गांवर गस्ती घालण्यात येईल. (प्रतिनिधी)ट्रेनवर फुगे आणि पिशव्या मारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत घडले आहेत. त्याचा आढावा घेऊन अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, नायगाव यांसह अन्य काही ठिकाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या रडारवर आहेत.- अनुप शुक्ला, पश्चिम रेल्वे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तरुळांशेजारी असणाऱ्या झोपडपट्ट्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.- दीपक देवराज, पश्चिम रेल्वे, पोलीस उपायुक्तमहिला डब्यांत आणि स्थानकांवर सुरक्षा ठेवली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे उल्हासनगर-विठ्ठलवाडी, पारसिक नाका येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. - सचिन भालोदे, मध्य रेल्वे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त
रेल्वेवर फुगे मारणाऱ्यांवर नजर
By admin | Published: March 11, 2017 1:25 AM