पूजा दामले, मुंबईभर उन्हात घामाच्या धारा लागल्या असताना बर्फाचा गोळेवाला, आइसक्रीम, लिंबू सरबत किंवा आंबा ज्यूसचा स्टॉल दिसल्यावर तिकडे पाय आपसुकच वळतात. त्याद्वारे थोडा दिलासाही मिळतो. पण, रस्त्यावर थंड पदार्थ विकणारे विक्रेते बर्फ कुठून आणतात, ते कुठले पाणी वापरतात, या सर्वांवर अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. अशुद्ध पाण्याचा, बर्फाचा वापर आढळल्यास भादंविनुसार ३२८ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.एप्रिल महिन्याचा एक-एक दिवस पुढे सरकतोय, त्याचबरोबर तापमानाचा पारादेखील चढतोय. उष्णता वाढत असल्याने थंडाव्यासाठी रस्त्यावरील लिंबू सरबत, आंबा ज्यूस, बर्फाचा गोळा, आइसक्रीम अशा पेयांना पसंती दिली जाते. पण, यासाठी वापरलेला बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशुद्ध पाण्यामुळे जुलाब, उलट्या, डायरिया, हगवण, कावीळ, पोटाचा संसर्ग असे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठीच एफडीए आता अशा बर्फावर नजर ठेवणार आहे. उकाडा वाढल्यावर थंडावा मिळावा, म्हणून शहरी भागात रस्त्यावरील थंड पेय, थंड पदार्थ खाण्याकडे कल अधिक दिसून येतो. यामुळे शहरी भागातील विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. दीड महिन्यापूर्वी वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी ११ जणांवर अशुद्ध पाणी वापरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिण्यायोग्य पाण्याचा अनेक ठिकाणी तुटवडा असल्याने बर्फासाठी अशुद्ध पाण्याचा वापर वाढतो. यामुळेच बर्फावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
अशुद्ध बर्फ विक्रेत्यांवर एफडीएची करडी नजर
By admin | Published: April 20, 2015 2:50 AM