जमीर काझी / मुंबईदसरा, मोहरम, दिवाळी हे महत्त्वाचे सण तोंडावर आले असताना, राज्यातील प्रमुख शहरांत अतिरेकी संघटनांकडून घातपाती कृत्य घडविले जाण्याची शक्यता वर्तवून, त्याबाबत दक्षता बाळगण्याची सूचना गुप्तचर यंत्रणाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इसिस, इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांच्या शोधाबरोबरच स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया (सीमी) या बंदी असलेल्या मूलतत्त्ववादी संघटनेच्या माजी सदस्यांवर गुप्तचर विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यांच्या हालचाली, वर्तणुकीबाबत गोपनीय माहिती मिळवित, त्या संशयास्पद वाटल्यास त्यांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना दिले आहेत. मुंबई, पुण्याबरोबरच प्रामुख्याने मराठवाड्यातील परभणी, लातूर, सोलापूर या भागांत ‘सिमी’शी संलग्न व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे, राज्यभरातील सिम कार्ड वितरक व विक्रेत्यांकडून गेल्या तीन महिन्यांतील विक्रीयादीची तपासणी संबंधित पोलीस घटकांकडून केली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षकांना विशेष संदेश पाठवून सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये २००१ पासून बंदी असलेल्या ‘सिमी’च्या माजी सदस्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवून, त्यांच्या वर्तणुकीबाबत साशंकता वाटत असल्यास, त्यांना तातडीने ताब्यात घेऊन योग्य कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध व अतिसंवेदनशील खासगी, सार्वजनिक, शासकीय ठिकाणी सुुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना राबवित, त्या ठिकाणी भेट देत पाहणी करावी, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचा आढावा घेऊन त्याचा तपास तातडीने करावा, मोबाइल कंपन्यांचे राज्यातील विविध ठिकाणचे वितरक व विक्रेत्यांशी संपर्क साधून, गेल्या तीन महिन्यांत विक्री झालेल्या सीम कार्डची माहिती संबंधित पोलीस घटकाच्या प्रमुखांनी उपलब्ध करून घ्यावी, त्यामध्ये संशयास्पद हालचाली व्यक्ती, संघटनांची नावे आढळल्यास, त्याची माहिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी, पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने वास्तव्यास आलेल्या व्यक्तींची माहिती जमा करून, त्याची पडताळणी करण्याबाबतची सूचना माथुर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
‘सिमी’च्या माजी सदस्यांवर नजर
By admin | Published: October 10, 2016 6:04 AM