- मयूर देवकरऔरंगाबाद: आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. औरंगाबाद येथील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये गणेशाची आरती एका स्वयंचलित रोबोटद्वारे केली जाते. ६४ कलांचा देवता असणा-या गणरायाची अशी आरती पाहुन काळ किती पुढे गेला आणि भविष्यात रोबोट काय काय करु शकतो याची कल्पना येते.हाती पंचारती घेऊन गजाननाची आरती करणारा हा रोबोट परिसरात कौतुक आणि औत्सुक्याचा विषय ठरत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील ‘टूल टेक टूलिंग्स' कंपनीमध्ये रोज सकाळी आणि सांयकाळी सर्व कर्मचारी आणि कामगारांच्या उपस्थितीत अशी 'टेक्नो आरती' केली जाते. ‘माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानामध्ये अफाट प्रगती साधली आहे आणि गणपती हा बुद्धिची देवता आहे. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून आपण तंत्रज्ञानातूनच गणरायासाठी काही तरी केले पाहिजे, या हेतूनेच हा उपक्रम साकारण्यात आला आहे, असे कंपनीचे संचालक सुनिल किर्दक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आपला बाप्पा नेहमीच प्रत्येकातील 'क्रिएटिव्हिटी' बाहेर काढतो. म्हणून तर यंदाच्या गणेशोत्सवात काही तरी हटके करायचे या विचारातून ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीतील इंजिनिअर्सनी रोबोटच्या हस्ते आरती करण्याचे ठरवले. कंट्रोल प्रमुख प्रदीप पांडे व कंट्रोल इंजिनिअर शुभम सौरभ यांनी या रोबोटवर काम केले आहे. ते सांगतात, ‘साधारण एक महिन्यापूर्वी सर्व टीम सदस्यांच्या चर्चेतून ही कल्पना समारे आली. वरिष्ठांकडून होकार मिळाल्यानंतर आम्ही काम सुरू केले. सर्वप्रथम तर आरती कशी केली जाते याचा सविस्तर अभ्यास केला. आरतीचे ताट कसे ओवाळतात, त्याची योग्य पद्धत काय, आरतीमधील इतर विधी कोणते हे आधी समजून घेतले. त्यानुसार मग रोबोटला कोणत्या सूचना द्यायाच्या त्याचा आराखडा बनवून प्रोग्राम तयार केला. दैनंदिन कामापेक्षा काही तरी वेगळे करायला मिळाले याचे खूप समाधान आहे.मग आरती म्हणण्यास किती वेळ लागतो, त्यानुसार ओवळणीची क्रिया निश्चित करण्यात आली. सेकंदा-सेकंदाचा आणि इंचा-इंचाचे मोजमाप करून रोबोटच्या हालचालींची आखणी व प्रोग्राम तयार करण्यात आला. आरती सुरू होताच रोबोट आरती ओवाळतो आणि आरती झाल्यावर सर्वांसमोर पंचाआरती धरून आरतीदेखील देतो.वेल्डिंग रोबोटचा असाही उपयोगआरतीसाठी वेल्डिंग रोबोटची निवड करण्यात आली. त्याची वेल्डिंग टॉर्च काढून त्याठिकाणी पंचाआरती बसविली. मग ओवाळणीचा वेग किती ठेवायचा. तो जास्त वेगाने नसावा कारण दिवा विझू शकतो आणि तो जास्त मंदवेगानेही नसावा. म्हणून अनेक चाचण्या व प्रात्याक्षिकांनंतर ओवाळणीचा वेग ७ मीटर प्रतिसेंकद एवढा निश्चित करण्यात आला. वेल्डिंग रोबोटचा अत्यंत खुबीने वापर करून त्याचा ओवाळण्याचा वेग, मार्ग, फे-या या सर्व प्रोग्रॅमद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत. आरतीच्या वेळेनुसार ओवाळणीचा वेग व रोटेशन बदलता येतात. रोबोटचे वजन १६० किलो असून यासाठी दिवसाला एका युनिटपेक्षाही कमी वीज लागते.
‘सर्व उद्योग कारखाने यंत्रावर अवलंबून आहेत. मग कंपनीतील गणपतीची आरती यंत्रानेच करावी जेणेकरून बाप्पाची कृपा त्यावर होईल, अशी या संकल्पने मागची भूमिका या प्लँट प्रमुख शैलेश मुळूक यांनी स्पष्ट केली. आरती करणारा हा रोबोट पाहण्यासाठी वाळूज औद्यागिक वासहतील इतर कंपन्यांचे कर्मचारी आणि कामगार आवर्जून आरतीला येतात. रोजच्या रटाळ वेळापत्रकातून जरा वेगळे काही तरी अनुभवाची संधी त्यांना यातून मिळते. जग ‘ऑटोमेशन’कडे जात असताना धार्मिकविधीदेखील ‘टेक्नो सॅव्ही होणार असे दिसतेय.देवाशी नाते जोडण्याचा प्रयत्न"गणपती बसविताना आम्ही ‘गो ग्रीन’ संकल्पेनेला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. लोखंड जोडणाºया रोबोटद्वारे देवाशी नाते जोडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून गणरायाचे वंदन करतो. हाच प्रयत्न आमच्या अभियंत्यांनीसुद्धा ‘रोबोट आरती’तून त्यांच्या कला-कौशल्यानुसार केला आहे." असे सुनिल किर्दक, संचालक, टूल टेक टूलिंग्स यांनी सांगितले.