- जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नक्षलग्रस्त भागातील वाढत्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी आता नागपुरात एच-१४५ हे अद्ययावत हेलिकॉप्टर कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी तीन वैमानिकांना फ्रान्सला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. त्यांना फ्रान्सच्या एअरबस हेलिकॉप्टर या उत्पादन कंपनीकडून हवाई उड्डाणाबाबतचे डीजीसीए/ ईएएसए हे मान्यताप्राप्त प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्य सरकार त्यासाठी तब्बल ३ कोटी ८९ लाख रुपये मोजणार आहे. या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्टÑ दिनी गडचिरोलीतील जांभूळखेडा या ठिकाणी नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्याबाबत सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असल्याने राज्य सरकारने येथे अद्ययावत शस्त्रसामग्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत ही प्रक्रिया राबविली जाईल. फ्रान्सच्या कंपनीने बनविलेले एच १४५ हेलिकॉप्टर या भागासाठी खरेदी केले जाईल. त्याद्वारे अल्पावधीत दुर्गम भागात शस्त्रसामग्री व अन्य साहित्याची ने-आण करता येणे शक्य आहे.
एच-१४५ हेलिकॉप्टर चालविण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण आवश्यक असल्याने तीन सरकारी वैमानिकांना त्यासाठी फ्रान्सला पाठविले जाईल. सुमारे महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी निवास व दैनिक भत्ता मिळून अनुक्रमे २९ हजार ९४० युरो व २० हजार १३७ युरो इतका खर्च अपेक्षित आहे. सध्या एका युरोचा दर ७७.६९ रुपये इतका असून त्या हिशेबाने भारतीय चलनात ही रक्कम ३ कोटी ८९ लाख ५२० रुपये होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.फ्रान्समधील प्रशिक्षणासाठी लागणारा कालावधी, तेथील निवास व भत्त्याबाबतचा सविस्तर अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने नुकताच मंजूर केला असून प्रशिक्षणाला पाठविण्यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
ही आहेत एच १४५ ची वैशिष्ट्ये
- एअरबस हेलिकॉप्टर कंपनीने बनविलेल्या या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरचा वेग प्रतितास २४० किलोमीटर इतका आहे.
- या हेलिकॉप्टरमध्ये १ किंवा २ चालक बसू शकतात आणि जास्तीतजास्त ९ प्रवाशांची आसन व्यवस्था आहे.
- हेलिकॉप्टर ३ तास ३६ मिनिटे सलग अंतराळात राहू शकते. ३८०० किलो वजन वाहून
- नेऊ शकते.
- पूर्ण इंधन क्षमतेनुसार ते ६५१ किमीचा प्रवास करू शकते. हेलिकॉप्टमधून रोपद्वारे जवानांना खाली उतरणे शक्य आहे.