एकीकडे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे आरोप सत्ताधारी भाजपा, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते करत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरेंनी जनादेश टाळला नसता आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले असते तर ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी असा आरोप ठाकरेंवर केला जात आहे. यावर राऊत यांनी एबीपी माझावरील मुलाखतीमध्ये भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे २०१९ मध्येच मुख्यमंत्री झाले असते, असे प्रत्युत्तर दिले आहे.
मोदी, शाह यांनी ठरवले तर ते कोणालाही तुरुंगात टाकू शकतात. परंतु सत्ता कायमची राहत नाही. तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजपा एकसंध आहे की नाही ते ४ जूनला कळणार आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. ते कुठून एवढ्या जागा आणणार आहेत? आम्ही महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा जिंकत आहोत. शिंदे, पवारांना एकही जागा मिळणार नाहीय, असा दावा राऊत यांनी केला.
सुनिल तटकरे यांनी याच कार्यक्रमात केलेल्या उद्धव ठाकरेंवरील दाव्यावर राऊतांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे शब्दाचे पक्के आहेत. तटकरेंच्या दाव्यावर तथ्य नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.