मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आक्रमक असलेल्या विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतकाँग्रेसवरही शिंदे यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून एक कविता ऐकवत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत खोचक टिप्पणी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, नाना पटोले इथे नाहीत, त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही. तसा काँग्रेसचा आधीही प्रॉब्लेम होताच. बाळासाहेब थोरात विचारायचे काय चालू आहे. मग मी माझ्या हातात काही नाही, माझ्या हातात असतं तर तुमच्यासाठी काहीतरी केलं असतं, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी सभागृहात एक कविता वाचून दाखवली. काँग्रेसची स्थिती पाहून येते दया,महाविकास आघाडीची पुरती गेली रया,दादा आणि अंबादास बसले,काँग्रेसवाले हात चोळत बसले, एकेकाळी इंदिराजींच्या काँग्रेसची होती किती वट आता टोमणेसेनेसोबत होतेय नुसती फरफट, अशा आठवले स्टाईल कवितेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले.
दरम्यान, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांनाही एकनाश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. हो मी कंत्राटी मुख्यंमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लगावला.