ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 - नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाला इंडिगो एअरलाईन्स या खाजगी कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून एका मोबाईलधारकाने दहा लाखाचा गंडा घातला.याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोदविण्यात आला.पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहमंदद नवाजुउद्दीन मोहमंद नईमुद्दीन(२५,रा.भडकलगेट जवळ)हा तरुण बेरोजगार असून त्याने शाईन डॉट कॉम या संकेतस्थळावर नोकरीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर १६जानेवारी रोजी त्यांना एका मोबाईलधारकाने फोन करुन तो जॉब एक्स्प्रेसमधून बोलत असल्याचे सांगितले.यावेळी त्याने त्यांच्याकडे विविध नोकऱ्या असून त्यांच्या कंपनीकडे नोंदणी करण्यासाठी १६५०रुपये नोंदणी शुल्क भरण्याचे सांगितले. नवाजुउद्दीनने तात्काळ पेटीएममार्फत आरोपीच्या खात्यात ही रक्कम पाठविली. दुसऱ्या दिवशी एका जणाने फोन करुन तुमची टेलिफोनिक मुलाखत घेणे आहे. शिवाय तुमची पडताळणी करावयाची असल्याने त्यासाठी ५ हजार ७००रुपये शुल्क पाठविण्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आरोपीने मुलाखत घेतली आणि मुलाखतीत तुम्ही उत्तीर्ण झाल्याचे कळविले. दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा संपर्क साधला आणि तुम्हाला आॅफर लेटर आणि लेटर मॉडिफि केशन चार्जेसाठी १४ हजार ५००रुपये भरण्याचे सांगितले. ही रक्कम आरोपीस पाठविल्यानंतर १९ रोजी आरोपीनेफोन करुन २१ दिवसाची ट्रेनिंग होणार असून यासाठी २५ हजार ९००रुपये भरावयास लावले. त्यानंतर त्याच दिवशी ई-मेलवर नोकरीचे आॅफर लेटर आरोपीने पाठविले.त्यानंंतर २० जानेवारी रोजी आरोपीने त्यांना तुमचा विमा उतरवायचा असल्याने त्यासाठी ३२ हजार ५००रुपये जमा करण्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तुमचे बँक खाते उघडण्यासाठी २९ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला पोस्टद्वारे नोकरीचे नियुक्तीपत्र घरपोच मिळेल तुम्हाला चिकलठाणा विमानतळावर रूजू व्हायचे आहे. चार दिवसानंतरही नोकरीचे पत्र न मिळाल्याने तक्रारदाराने आरोपीशी संपर्क साधला असता त्याने काही तांत्रिक कारणामुळे तुमचे नियुक्तीपत्र पाठविता आले नाही.तुमची रूजू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. चार दिवसानंतर आरोपीने फोन करुन विमानतळापासून पाच किलोमिटरच्या आत तुमच्यासाठी निवासस्थान पाहण्यात आले असून यासाठी ४३ हजार रुपये आरोपीने मागितले. यावेळी नवाजुद्दीन यांनी ही रक्कम जमा करण्यासाठी अवधी मागितला. आरोपीने आतापर्यंत आपल्याकडून तब्बल १० लाख ९ हजार ८५०रुपये उकळले तक्रारदारास संशय आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदविली.