ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १८ - विदर्भ व मराठवाडा अविकसित राहण्यामागे सत्तेवर आलेले प्रत्येकच सरकार जबाबदार आहे. सत्तेवर आलेल्यांनी या दोन्ही प्रदेशांना योग्य न्याय दिला नाही. पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व लुटारू आहे. त्यामुळेच त्यांनी विदर्भ व मराठवाड्यावर कायम अन्याय केल्याची घणाघाती टीका अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केली.वनराई फाऊंडेशनच्यावतीने सोमवारी नागपुरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. सरकारचा इतिहास नेहमीच अन्यायकारक राहिला आहे. सत्ताधाऱ्यांनी कधीही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही प्रदेशाच्या विकासाचा बॅकलॉग सहजासहजी भरून निघणे शक्य नाही. सध्याचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, मात्र तेही काय करतील हा प्रश्न आहे. त्यांना जाब विचारणारी पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. केवळ राजकारण्यांना दोष देण्यात अर्थ नाही. समाजही जागृत झाला पाहिजे. त्यामुळे सांस्कृतिक शुद्धीकरणासह राजकारण व समाजाचेही शुद्धीकरण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.विदर्भावर अन्याय झाला हे सत्य मान्य केले तरी स्वतंत्र राज्य निर्माण करणे हा काही उपाय नाही. राज्याचे तुकडे होणे मान्य नसल्याचे सांगत त्यांनी विदर्भाच्या मागणीला तत्त्वत: विरोध असल्याचे मत व्यक्त केले. त्यापेक्षा सिंचनाचा अनुशेष दूर करून औद्योगिक विकास साधावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने नागपूर किंवा विदर्भात मराठी विद्यापीठाची स्थापना करून साहित्यिक बॅकलॉग दूर करावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लुटले - श्रीपाल सबनीस
By admin | Published: July 18, 2016 9:11 PM