मेहकर (जि. बुलडाणा) : पाच लाख रुपयात दोन किलो सोने देतो, असे म्हणून एका जणाला ५ लाख रुपयांनी लुटल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता मेहकर डोणगाव रोडवर गजानन महाराज मंदिर परिसरात घडली. दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दोन आरोपींना पकडले . साजन अशोक वाघेला (२३) रा.विक्रोळी (पु) मुंबई यांना कृष्णा नामक व्यक्तीने ५ लाख रुपयांमध्ये २ किलो सोने देतो, असे म्हणून मेहकरला बोलाविले होते. दरम्यान साजन वाघेला हा २ किलो सोने मिळविण्याच्या आशेने ६ सप्टेंबर रोजी मेहकर डोणगाव रोडवरील गजानन महाराज मंदिर परिसरात आला. तेव्हा कृष्णा, नंद्या व त्यांच्या ५ ते ६ साथीदारांनी साजन वाघेला यांना लाठीकाठीने मारहाण केली. तसेच शस्त्राचा धाक दाखवून ५ लाख रुपये, मोबाईल, कागदपत्रे व निळ्या रंगाची पिशवी असा एकूण ५ लाख ७0 हजार रुपयाचा ऐवज लुटून एम.एच.२९ ए.क्यू.३४६७ क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीत बसून डोणगावकडे पलायन केले. यासंदर्भात साजन वाघेला यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असता उपविभागीय पोलिस अधिकारी सुहेल शर्मा, ठाणेदार एम.डी.राठोड, पोउनि अमोल ढाकणे, चव्हाण व डोणगावच्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन आरोपीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात कृष्णा व नंद्या या दोन आरोपींना अटक करण्यात आली. वृत्त लिहेस्तोवर पोलिस तपास सुरु होता.
सोने देण्याचा बहाणा करुन ५ लाख रुपये लुटले
By admin | Published: September 07, 2015 12:06 AM