- कापूस व्यापा-याची बॅग पळविली
औरंगाबाद : शहराच्या सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर सोमवारी सायंकाळी एका कापूस व्यापाºयाचे मोटारसायकस्वार तिघांनी तब्बल पावणेबारा लाख रुपये लुटून नेले. खंडपीठाच्या सिग्नलवर ही घटना घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शेख रियाज शेख वजीर (४०, रा. कौडगाव, औरंगाबाद) हे कापूस खरेदी-विक्रीचा व्यापार करतात. गावातून खरेदी केलेला दोन ट्रक कापूस नुकताच त्यांनी औरंगाबादेतून परराज्यात पाठविला होता. पाठविलेल्या कापसाचे पेमेंट घेण्यासाठी ते सोमवारी गावातील देवराव भावराव पुंड (५५) यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून औरंगाबादेत आले. सायंकाळी रियाज यांनी औरंगपुºयातील एका ठिकाणाहून विकलेल्या कापसाचे ११ लाख ७२ हजार रुपये पेमेंट घेतले. ही रक्कम एका बॅगमध्ये ठेवली. ती बॅग देवरावच्या हातात दिली. बॅग घेऊन हे दोघे मोटारसायकलवर पुन्हा गावाकडे जाण्यासाठी निघाले.
जालना रोडने ते गावाकडे परतत होते. औरंगाबाद खंडपीठासमोर सिग्नल लागल्याने रियाज यांनी दुचाकी थांबविली. त्याचवेळी अचानक एक मोटारसायकल त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्या दुचाकीवर तिघे बसलेले होते. काही समजण्याच्या आत बाजूच्या मोटारसायकलवरील तिघांपैकी एकाने हिसका मारून देवरावच्या हातात असलेली पावणेबारा लाख रुपयांनी भरलेली बॅग ओढून घेतली. बॅग हाती येताच तिघे सिग्नल तोडून सुसाट वेगाने सिडको बसस्थानकाच्या दिशेने निघून गेले.
या प्रकाराने रियाज व देवराव यांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, काही हालचाल करण्याच्या आत लुटारूंची दुचाकी गायब झाली होती. हा प्रकार जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाच्या लक्षात आला. तातडीने या पोलिसाने नियंत्रण कक्षात माहिती कळविली. माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. नंतर पोलिसांनी नाकाबंदी करून लुटारूंचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी हाती लागले नाहीत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.