लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात वेगवेगळी कारणे पुढे करत अत्यावश्यक वस्तू आणि किराणा चढ्या भावाने विकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचा आक्षेप ७१ टक्के ग्राहकांनी नोंदवला आहे.
मूळ उत्पादकांनी वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. कमिशनही घटवलेले नाही, तरीही किरकोळ व्यापाऱ्यांनी सवलती रद्द करून जास्त दराने विक्री केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अवघ्या २५ टक्के ग्राहकांनी मूळ किंमतीत वस्तू मिळाल्याचे म्हटले आहे. वस्तू घरपोच देणे, मजुरांची टंचाई, हमाली, वाहतुकीचा वाढलेला खर्च अशी कारण देत चढा भाव लावल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
लोकल सर्कल या संस्थेने देशाच्या २१० जिल्ह्यांतील विविध उत्पन्न गटातील सुमारे १६ हजार ५०० ग्राहकांशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यात ४६ टक्के महिला आणि ५४ टक्के पुरूषांचा समावेश होता. महानगरांमधील ३२ टक्के लोकांचे अभिप्राय यात आहेत. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ५३ टक्के ग्राहक जवळच्या किराणा दुकानातूनच साहित्याची खरेदी करतील, असा या पाहणीचा निष्कर्ष आहे. आॅनलाइन (१७ टक्के) आणि रिटेल स्टोअरमधून आॅनलाइन खरेदी (८ टक्के) असे खरेदीचे प्रमाण असेल, असे या सर्वेक्षणात दिसून आले.
ई कॉमर्स कंपन्यांचा मुकाबला करण्यासाठी किरकोळ दुकानदारही पूर्वी काही सवलती देत होते. मात्र, ई कॉमर्सला लॉकडाउनचा तडाखा बसताच किरकोळ व्यापाऱ्यांनीही सवलती रद्द केल्या. आता ई कॉमर्सच्या सवलती सुरू होत असल्याने किरकोळ व्यापाºयांकडील सवलती पुन्हा मिळतील, अशी आशा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
आपली सोसायटीच बरी!लॉकडाउनच्या काळात अनेक सोसायट्यांनी त्यांच्या आवारात किराणा माल मागवला. त्याच पद्धतीने पुढील काळातही खरेदी करण्याचा मानस १८ टक्के ग्राहकांनी व्यक्त केला. अन्य ग्राहकांतील २८ टक्के ग्राहकांना कोरोनाच्या दहशतीमुळे पुढील काळातही दुकानांमध्ये जाण्याची भीती वाट असून त्यांनीही घरपोच साहित्य मागवण्याकडेच कल असेल, असे मत नोंदवल्याचे हा अहवाल सांगतो.