मुंबई : राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याची तयारी दाखवलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांना मान्यता देणे दूर राहिले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा करीत आहे. प्रभूंच्या अवकृपेने महाराष्ट्रातील सरकार खट्टू झालेले असतानाच ‘प्रभू’कृपा झालेल्या प्रकल्पांकरिता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने कर्ज काढण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्रातील आठ रेल्वे प्रकल्पांकरिता ५० टक्के रक्कम देण्याचे राज्य सरकारने ठरवले असून, त्याकरिता खर्च होणाऱ्या ११ हजार ५०० कोटी रुपयांपैकी निम्मी रक्कम सुमारे ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. या आठ प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असली तरी पुणे-नाशिक, मनमाड-धुळे-इंदौर, गडचांदूर-आदिलाबाद या तीन प्रकल्पांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही. हे प्रकल्प महाराष्ट्रातील प्रवाशांकरिता महत्त्वाचे असल्याचे वारंवार रेल्वेमंत्री व मंत्रालय यांच्या निदर्शनास आणूनही ‘प्रभू’कृपा होण्याची चिन्हे दिसत नाहीत.रेल्वेमंत्री झाल्यापासून प्रभू यांनी को.रे.चे दुपदरीकरण, विद्युतीकरण, सावंतवाडी टर्मिनलचे भूमिपूजन आणि कराड-चिपळूण मार्ग यांची घोषणा केली. राज्याच्या आठ प्रकल्पांच्या यादीत केवळ कराड-चिपळूणचा समावेश आहे.सावंतवाडी टर्मिनससाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च कोकण रेल्वे स्वत: करणार आहे; तर दुपदरीकरण व विद्युतीकरणाचा एकूण खर्च १० हजार कोटी रुपये आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी दिली. विद्युतीकरणावर ७५० कोटींचा खर्च आहे. प्रायोगिक तत्त्वावर ५० कि.मी. दुपदरीकरणासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
राज्यावर ‘प्रभू’कृपा होईना!
By admin | Published: July 10, 2015 2:19 AM