मुंबई : युरोपीय देशात खो-खो खेळाचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी इंग्लंडचा पुरुष संघ भारत दौऱ्यावर आला आहे. १६ सदस्यांचा समावेश असलेला इंग्लंड संघ शुक्रवारी मुंबईत दाखल झाला आहे. महाराष्ट्रासह अजमेर आणि दिल्ली येथे इंग्लंड संघ प्रत्येकी एक सामना खेळेल. मालिकेतील उद्घाटनीय सामना कोपरखैरणेतील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता खेळवण्यात येणार असून या सामन्यात इंग्लंडविरुध्द ‘दक्षिण-पश्चिम भारत’ असा संघ लढेल. इंग्लंडविरुद्ध भारतीय महासंघाने देशभरातील खेळाडूंची दक्षिण, पश्चिम, मध्य, उत्तर आणि पूर्व अशा पाच विभागात गटवारी केली आहे. उद्घाटनीय सामन्यासाठी कोपरखैरणे येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण-पश्चिम भारतीय संघात महाराष्ट्राच्या संकेत कदम, सुरेश सावंत, सुयश गरगटे आणि हर्षद हातणकर यांचा समावेश करण्यात आला असून प्रशिक्षकपदी महाराष्ट्राच्या मयुर पालांडे यांची निवड झाली आहे. अजमेर येथे इंग्लंडचा सामना ‘मध्य-उत्तर भारत’ आणि दिल्ली येथे ‘पूर्व-उत्तर भारत’ विरुद्ध होईल. जागतिक स्तरावर खो-खोचा ठसा उमटवण्यासाठी भारतीय खो-खो महासंघांच्या वतीने गल्यावर्षी १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धा आणि तिसऱ्या आशियाई खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन स्पर्धेप्रमाणेच इंग्लंडचा संघ भारतात खेळणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय खो - खो सामना
By admin | Published: January 28, 2017 3:36 AM