मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर न्यायालयाची परवानगी न घेताच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची परवानगी दिल्याबद्दल विशेष न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी कोठडीत असलेल्या भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याबाबत आपली काहीच भूमिका नाही, असे गेल्या महिन्यात डॉ. लहाने यांनी विशेष न्यायालयाला सांगितले होते. तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात दाखल केले होते. भुजबळांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले गेले, त्यावेळी काही चाचण्यांबाबत दुसरे मत घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाने त्यांची रवानगी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केली. मात्र, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. डॉ. लहाने यांच्या शिफारशीवरूनच भुजबळ यांच्यावर व्हीआयपी ट्रिटमेन्ट झाली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केला होता. तशी तक्रारही त्यांनी दाखल केली होती. भुजबळ बॉम्बे हॉस्पिटमध्ये उपचार घेत असताना अनेक राजकीय नेते त्यांना भेटल्याची बाबही दमानिया यांनी तक्रार अर्जात नमूद केली होती. न्यायालयापुढे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता जे. जे. रुग्णालय आग्रही होते असे दिसून येते. न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला भुजबळांच्या तीन वेगवगेळ्या चाचण्या करण्याचा आदेश दिला होता. पण भुजबळांना असलेल्या अन्य आजारांवर उपचार करण्याचा अधिकार दिला नव्हता. भुजबळ यांना मनी लाँड्रींगप्रकरणी १४ मार्च रोजी ईडीने अटक केली. त्यानंतर तब्येतीचे कारण देत भुजबळ दोन महिने उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत राहिले. (प्रतिनिधी)
भुजबळप्रकरणी लहाने दोषी
By admin | Published: January 14, 2017 5:33 AM