मुंबई : रेल्वेला तोटा सहन करावा लागत असल्याने त्याची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक अजब निर्णय घेतला आहे. उपनगरीय लोकल तिकिटांवर आणि मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांवर तोट्याचा उल्लेख करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडून त्याची तीन दिवसांपासून अंमलबजावणी केली जात आहे. लोकल चालविताना रेल्वेला बराच तोटा सहन करावा लागत आहे. उत्पन्न मिळत नसल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करायचा तरी कशा असा प्रश्न उपस्थित करतानाच तिकिटांचा दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येते. तिकिटांचे दर वाढविण्याचा निर्णय घेताच, प्रवाशांकडून त्या विरोधात ओरड केली जाते. मात्र, सबसिडीमुळे स्वस्त होणारा प्रवास त्यातच तिकिटांच्या किमतीत वाढ न केल्याने नुकसान रेल्वेला सहन करावे लागते. सध्या ३६ टक्के इतका महसूल रेल्वेला मिळत असून, त्यामुळे उपनगरीय सेवेवरील तोटा हा ६४ टक्के इतका मोठ्या प्रमाणात असल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रेल्वे तिकिटांवर आता तोट्याचा उल्लेख
By admin | Published: June 20, 2016 3:56 AM