गौरीशंकर घाळे / मुंबईसत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालविला आहे. प्रचारात या पक्षांनी ज्या प्रमाणावर पैसा उधळण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो असे वाटू लागल्याची तिरकस भावना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी या वेळी जोरदार टीका केली. नोटाबंदीनंतर फक्त भाजपाकडेच पैसा दिसतोय. निवडणुकीत फक्त आपल्याकडेच पैसे राहतील अशी व्यवस्था भाजपाने केली. सगळी निवडणूकच पैशाचा खेळ बनवून टाकल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. २० वर्षे महापालिकेत सत्ता असूनही या पक्षांना विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळेच आता एकमेकांवर टीका करण्याचा खेळ शिवसेना - भाजपाने चालविला आहे. आधी टीका करायची आणि नंतर एकत्र यायचे हेच भाजपा, शिवसेनेचे धोरण आहे. कल्याण-डोंबिवलीतही त्यांनी हेच केले होते, अशी टीका राज यांनी केली. विकासकामे केली असती तर मुख्यमंत्री फडणवीस यांना थापा माराव्या लागल्या नसत्या. ते टीका करताहेत आणि मनसे आपल्या विकासकामांचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ करत आहे. पाच वर्षांचा कामांचा असा लेखाजोखा मांडणारा मनसे हा पहिलाच पक्ष असल्याचा दावाही राज यांनी केला. मनसेला लागलेल्या गळतीबाबत विचारले असता राज म्हणाले की, काही लोकांसाठी महापालिका म्हणजे पैसे कमावण्याचे दुकान आहे. अशा लोकांना विरोध केला म्हणूनच ही मंडळी वैयक्तिक कारणासाठी पक्ष सोडून गेली. मात्र अशा लोकांच्या जाण्याने मनसेला काही फरक पडणार नाही. सामान्य मनसैनिक आणि जनता आजही माझ्यासोबत आहे. तसे नसते तर नाशिकच्या सभेत इतकी गर्दी आणि उत्साह दिसला नसता, असेही राज म्हणाले. मुंबई तोडण्याचा डावप्रस्तावित मुंबई मेट्रोचा मार्ग आणि रचना मुंबईतील मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे. मेट्रो जिथे येईल तिथे जागांचे भाव वाढतील आणि मराठी माणूस स्वाभाविकपणे बाहेर फेकला जाईल. या दृष्टीनेच मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मी कधीच विकासाला विरोध केला नाही. मात्र हा विकास बाहेरच्यांच्या पथ्यावर तर पडत नाही ना, याचा विचार व्हायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले.
पैसे खाण्यात कमी पडलो : राज ठाकरे
By admin | Published: February 20, 2017 4:17 AM