मुंबई : रक्तातील विविध घटक वेगळे करणारे गेली सात वर्षे बंद पडलेले यंत्र दुरुस्त न केल्याने किंवा ३०-३५ लाख रुपये खर्च करून नवे यंत्र न घेतल्याने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून घेण्यात किंवा असलेल्या जागांना मान्यता मिळविण्यात वारंवार अपयश आले आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नव्या नियमांनुसार पदव्युत्तर जागा वाढविण्यासाठी किंवा त्यांना मान्यता मिळण्यासाठी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे असे रक्त विश्लेषक यंत्र असणे ही बाब अनिवार्य आहे. हे यंत्र रक्तातील प्लेटलेट, प्लाझ्मा व लाल रक्तपेशी असे घटक वेगळे करते. यामुळे रुग्णांना प्रत्येक वेळी सर्व रक्त न देता त्यातील घटक गरजेनुसार देणे शक्य होते. परंतु यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील असे यंत्र सन २००८पासून नादुरुस्त असल्याने या महाविद्यालयाचे पदव्युत्तर जागा वाढविण्याचे किंवा आधीपासून असलेल्या जागांची मान्यता पुढे सुरू ठेवण्याचे प्रस्ताव मेडिकल कौन्सिलकडून वारंवार फेटाळण्यात आले आहेत. गेल्याच वर्षी स्त्रीरोग, बालरोग आणि नेत्ररोग विभागांमध्ये प्रत्येकी एक वाढीव पदव्युत्तर जागेचा प्रस्ताव प्रामुख्याने याच कारणावरून अमान्य झाला होता. यवतमाळ कॉलेजमध्ये असे यंत्र १९८९मध्ये घेतले गेले. परंतु कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक न वापरल्याने ते वारंवार बिघडू लागले व २००८मध्ये पूर्णपणे बंद पडले. अशा प्रकारच्या नव्या यंत्राला ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो. परंतु राज्य सरकारने गेली इतकी वर्षे काहीच हालचाल न केल्याने त्याचा फटका रुग्णांना व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनाही बसत आहे.या भागात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे व तेथे डेंग्यूचाही प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज भासते. परंतु शासकीय इस्पितळात ही सोय नसल्याने प्लेटलेट घेण्याऐवजी गरज नसताना संपूर्ण रक्त घ्यावे लागते. ज्यांना फक्त प्लेटलेट हव्या असतात त्यांना त्यासाठी खासगी रुग्णालयांत पाठविले जाते. एका पिशवीसाठी १,४०० रुपये मोजावे लागतात.एका राष्ट्रीय योजनेअंतर्गत स्टेट ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिलने राज्यातील सर्व १४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना अशी रक्ताचे पृथक्करण करणारी यंत्र पुरविणे अपेक्षित होते. परंतु गेल्या वर्षभरात त्या दिशेने काहीच झालेले नाही. आता राज्याच्या अर्थसंकल्यात तरतूद करून ती घ्यावी लागतील. ती घेतल्यावर पहिले यंत्र यवतमाळला दिले जाईल.- डॉ. प्रवीण शिंगारे,वैद्यकीय शिक्षण संचालक
वाढीव पदव्युत्तर जागा गमावल्या
By admin | Published: October 27, 2015 2:20 AM