मुंबई - योग्य वापर केल्यास सोशल मीडिया वरदान ठरू शकतो याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा आला. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या कोकणातील एका आजोबांना तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपवर त्यांची माहिती देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने पुन्हा एकटा कुटुंबीयांची भेट घडली. त्याचे झाले असे की दोन वर्षांपासून वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथून बेपत्ता असलेले गणपत बाळू सावंत (65) हे आजोबा आज डोंबिवलीतील मानपाडा रोड येथील स्टार कॉलनीजवळ अभिषेक परब या तरुणाला सापडले. आपल्याच विश्वात हरवलेले आणि भूकेने व्याकूळ झालेल्या या आजोबांची सदर तरुणाने विचारपूर केली. तसेच त्यांना खायला हवे का? असे विचारले. त्यावेळी या आजोबांनी आपल्या पिशव्या हरवल्या असून, आपण त्या शोधत आहोत, असे मालवणी भाषेत सांगितले. सदर तरुणही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने त्याने आजोबांचे बोलणे ऐकून अधिक विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपले नाव गणपत बाळू सावंत असल्याचे सांगितले. अभिषेक परब यांनी प्रसंगावधान दाखवत या आजोबांना आपल्यासोबत घरी नेले. तसेच या आजोबांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परब यांनी आजोबांचा फोटो आणि त्यांची थोडक्यात माहिती व्हॉट्स अॅपवर शेअर केली. बघता बघता ही पोस्ट बहुतांश व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल झाली आणि आजोबांचे कुटुंबीय आणि गाववाल्यांपर्यंत पोहोचली. अनेक जणांनी सदर गृहस्थ दोन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. दरम्यान, या आजोबांचा मुलगा दीपक सावंत यांनी अभिषेक परब यांच्याशी संपर्क साधला. तसेच आपण कल्याण येथे राहण्यास असून, तातडीने डोंबिवलीत पोहोचते, असे सांगितले. काही वेळाने दीपक सावंत डोंबिवलीत आले आणि अखेर दोन वर्षांनंतर पिता-पुत्रांची भेट झाली. देवदूतासारख्या धावून आलेल्या अभिषेक परब यांचे आभार मानून सावंत पिता पुत्र घरी परतले. दरम्यान, अभिषेक परब यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
तरुणाचे प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपमुळे सापडले दोन वर्षांपासून बेपत्ता असलेले आजोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 12:42 AM