पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारपर्यंत केवळ ४७ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. अद्यापही जवळपास ८० हजार जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. ‘आरटीई’नुसार आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या जागांवर प्रवेशासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. राज्यात आरटीईअंतर्गत १ लाख १७ हजार ५४५ जागा आहेत. त्यासाठी केवळ ७४ हजार अर्ज आले होते. आतापर्यंत केवळ ३७ हजार ७४५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला गोंधळाची स्थिती होती. खासगी शाळांकडून परताव्याच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे या प्रवेशाबाबत पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक पालकांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याचे टाळल्याचे दिसते.राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. असे असले तरी राज्यातील अनेक शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. पालकांकडूनही ठराविक शाळांनाच पसंती मिळाल्याचे दिसते. ज्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे, त्यापैकी अनेक पालकांनी हवी असलेली शाळा न मिळाल्याने संबंधित शाळेत प्रवेश घेतलेला नाही. आॅगस्ट महिना संपत आला तरी अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू असून शिक्षण विभाग मुलांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. यावर्षी प्रवेशासाठी तुलनेने कमी अर्ज आल्याचे शिक्षण संचालनालयातून सांगण्यात आले.दरम्यान, शाळांमध्ये रिक्त जागा राहिल्यास संस्थास्तरावर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.>आरटीईचे जिल्हानिहाय झालेले प्रवेश :पुणे ८ हजार ११७, नागपूर ४ हजार ८१८, मुंबई २ हजार ४२३, ठाणे २ हजार ५२५, नाशिक १ हजार ९९०, औरंगाबाद १ हजार ५९०, रायगड १ हजार ३८१, अकोला १ हजार ३१२, जळगाव १ हजार १३७, बुलडाणा ८०२, वाशिम २८८, अमरावती १ हजार ८५०, वर्धा ९२१, भंडारा ३३०, गोंदिया ४१४, गडचिरोली १००, चंद्रपूर ३४१, यवतमाळ ८६५, नांदेड ७६७, हिंगोली ११४, परभणी १२७, जालना ६५४, अहमदनगर १ हजार ३४७, बीड ४४३, लातूर ४९२, उस्मानाबाद ४१२, सोलापूर ५२४, सातारा ५६८, रत्नागिरी १२८, सिंधुदुर्ग ८०, कोल्हापूर २१८, सांगली १६४, पालघर ८७, नंदुरबार ६३, धुळे ३५३.
राज्यात आरटीई प्रवेशाला खो
By admin | Published: August 23, 2016 1:18 AM