मुंबई- राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अजून खूप लोक रांगेत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिलाय.निरंजन डावखरे यांचं भाजपामध्ये स्वागत करतो. ते पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, पण वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असं देवेंद्र फडणवीस उपस्थित पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत. विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत आज राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायला आले होते. त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर करावर कर असल्यानं किंमत वाढली आहे. आम्ही कर आधीच कमी केले आहेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे त्याची किंमत कमी होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. केंद्रानं मुंबईच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सिंचनासाठी भरघोस निधी दिला आहे.