पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय कवितेतून सचित्र मार्गदर्शन : ‘आयसीएसई’चा प्रताप
नागपूर, दि. 30 - लहान मुलांना शाळेतील धडे शिकविण्यासाठी विविध प्राण्यांच्या चित्रांचा वापर करण्यात येतो. परंतु पुस्तकात एखाद्या माकडाच्या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धूम्रपानाचे धडे देण्यात येत असतील तर या प्रकाराला काय म्हणावे ? लहान मुले व तरुण पिढी धूम्रपानापासून दूर रहावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना ‘आयसीएसई’च्या पुस्तकातून असे चुकीचे धडे देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मुलांवर काय संस्कार होतील असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
नागपुरातील एका नामांकित ‘सीबीएसई’ शाळेतील पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेसाठी ‘आयसीएसई’चे ‘रंगोली’ नावाचे पुस्तक अनिवार्य करण्यात आले आहे. या पुस्तकात पृष्ठ क्रमांक १०१ वर ‘सरकस’ नावाची कविता आहे. या कवितेत सिगार पेटविणा-या एका माकडाचे चित्र असून कवितेतील दोन कडव्यांमध्ये चक्क धूम्रपान कसे करावे याचे वर्णनच केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षकांना यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही व विद्यार्थ्यांना कविता सखोल शिकविण्यात आली. इतकेच काय पण त्यावर परीक्षा घेऊन याबाबत प्रश्नदेखील विचारण्यात आला. माकडे कसे धूम्रपान करतो, त्यापासून त्याला कसा आनंद मिळतो, हे विद्यार्थ्यांना सांगणे चिंताजनक आहे. एकीकडे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत असताना आणि तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्याही वाढलेली असताना असे 'प्रोत्साहन' कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पालक संतप्त, शिक्षणमंत्र्यांनी पावले उचलावी
नागपूरातील सुजाण पालकांनी यासंदर्भात संतप्त भावना व्यक्त करीत आक्षेप नोंदविला आहे. संबंधित शाळेच्या पदाधिका-यांनी यासंदर्भात मौन साधले आहे. सिगरेटच्या पाकिटावरही धुम्रपान आरोग्यास हानीकारक असल्याच वैधानिक इशारा ठळकपणे छापणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. सिनेमासारख्या मनोरंजनाच्या साधनातही सरसकट धूम्रपानाच्या दृश्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पाठ्यपुस्तकात लहान मुलांना अशी कविता छायाचित्रासह शिकविले जात आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी पावले उचलावी अशी मागणी एक पालक राजेश विसपुते यांनी केली आहे.