मुंबई : ऊसदरप्रश्नी तोडगा काढून येत्या आठवड्याभरात दर घोषित करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भय्या देशमुख यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भय्या यांनी मागण्यांचे निवेदन दिले. शिवाय आठ दिवसांत दर घोषित केले नाही, तर सोलापूर एसटी स्टँडपासून पालकमंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत लोटांगण घालून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला असूनही सरकारने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे गळीत हंगामातील गेलेल्या उसाला पहिली उचल ३ हजार रुपये आणि दोन महिन्यांचे व्याज बँक खात्यावर जमा करावे. उसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये देणे कोणत्याही कारखानदाराला परवडते. कारण केवळ साखरेच्या दरावर भाव ठरवणाऱ्या प्रशासनाने उसापासून तयार होणाऱ्या मळी, भुस्सा, इथेनॉल, वीज, दारू फॅक्टरी (वाईनरी) हे विविध प्रकारचे उत्पादनही ध्यानात घ्यायला हवे. त्याचा कोट्यवधी रुपयांचा फायदा साखर कारखानदारांना होतो. त्यामुळे या सर्व उत्पादनांचा विचार करून सरकारने उसाचे दर जाहीर करावेत, अशी मागणी भय्या यांनी केली आहे.दरम्यान, जुन्या एफ.आर.पी.च्या नियमात बदल करण्याची मागणी भय्या यांनी केली आहे. चालू खताचे दर, मजुरी, वीज, रोगांचे औषध या वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र ऊसदरात वाढ केली जात नाही. शिवाय सर्व कारखान्यांच्या जवळपास डिजिटल वजनकाटे बसवून शेतकऱ्यांची लूटमार थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ऊसदरासाठी करणार लोटांगण आंदोलन
By admin | Published: January 16, 2015 6:17 AM