मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणे व स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. दि. १८ मार्च, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून दि. २७ मार्च, २०२१ रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथील सी. बी. एस. रोडवरील गृहनिर्माण भवन येथे संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
सदर सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिकांचा समावेश आहे. या सोडतीकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. १७ मार्च, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांनाच सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज दि. १८ मार्च, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. अनामत रकमेची ऑनलाईन स्वीकृती दि. १९ मार्च, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच बँकेत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरणा दि. १९ मार्च, २०२१ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांची या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्यल्प उत्पन्न गटात अर्ज करण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न २५ हजार रुपये असणे आवश्यक आहे. या गटात अर्ज करण्यासाठी अर्जासोबत पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
अल्प उत्पन्न गटात अर्ज करण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न रु. २५,००१ ते रु. ५० हजार असणे आवश्यक आहे. या गटात अर्ज करण्यासाठी अर्जासोबत १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
मध्यम उत्पन्न गटात अर्ज करण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न रु. ५०,००१ ते रु. ७५ हजार असणे आवश्यक आहे. या गटात अर्ज करण्यासाठी अर्जासोबत १५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीत सदनिका लागली नाही तर अनामत रक्कम परत केली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना : सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) पडेगाव (जि. औरंगाबाद) येथे ३६८ सदनिका, हिंगोली येथे १३२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना : २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ०७ सदनिकांचा समावेश आहे. तर अल्प उत्पन्न गटाकरिता देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १२ सदनिका, सहानुरवाडी (औरंगाबाद) येथे २८ सदनिका, सातारा (औरंगाबाद) येथे ७६ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका व हर्सूल (जि. औरंगाबाद) येथे ०२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजना : म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी हिंगोली येथे ४८ सदनिका तर मध्यम उत्पन्न गटासाठी पडेगाव (जि. औरंगाबाद) येथे १६८ सदनिका विक्रीसाठी सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीबाबत अधिक माहितीसाठी व माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.