ऑनलाइन लोकमतयेवला (नाशिक), दि. 13 - येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शहरातील मुक्तिभूमीवर लाखो भीमसैनिकांनी उपस्थित राहात डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ८१ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो समाजबांधवांनी हजेरी लावत नतमस्तक झाले. सकाळपासूनच येवला विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाऊले चालती मुक्तीभूमीची वाट म्हणत लाखो दलित बांधव मुक्तिभूमीवर नतमस्तक झाले. भारतीय बौद्ध महासंघाचे ध्वजारोहण अनिक गांगुर्डे यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाने शहरातून रॅली काढली. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अॅड. माणिकराव शिंदे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, देवीदास निकम यांनी केले. स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. येवल्यात आलेल्या बौद्ध भिक्कूनी मुक्तिभूमी ते येवला-विंचूर चौफुलीदरम्यान रॅली काढली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वैभव पगारे, वैभव साबळे, गौरव साबळे, पंकज घोडेराव, गणेश जाधव, संदीप झाल्टे, तेजस घोडेराव यांनी मोफत चरणसेवेचा विभाग सांभाळला. स्वारिपच्या वतीने रेडिओ व टीव्ही कलाकारांचा संगीत कलारजनीचा कार्यक्र म उशिरापर्यंत सुरू होता.अनेक ठिकाणांहून बसेस, मोटारसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा व पदयात्रेने लोक येथे येत होते. डीजेच्या तालावर भीमगीतांचा गजर करीत खेड्यापाड्यातून आलेला जनसागर रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत होता.
मुक्तिभूमीवर लोटला भीमसागर
By admin | Published: October 13, 2016 5:10 PM