ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 21 - चंद्रपूर महानगर पालिकेसाठी झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवित भाजपाने कमळ फुलविले आहे. भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यचा मार्ग मोकळा केला आहे, तर काँग्रेसची मात्र प्रचंड घसरण झाली असून त्यांना फक्त १२ जागांवर विजय मिळविता आला आहे.
१७ प्रभागातील ६६ जागांसाठी या निवडणुका पार पडल्या. भाजपासह काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. केंद्रात, राज्यात आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असल्याने शहराचा विकास करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता सोपवा असे आवाहन करीत भाजपाच्या दोन्ही मंत्र्यांनी प्रचारात उडी घेतली होती. तर, मालमत्ता करातील अवाजवी करवाढीचा मुद्दा घेवून काँग्रेसने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या होत्या. भाजपा आणि काँगे्रसच्या उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या काट्याच्या लढतीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. त्यामुळे काँग्रसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे.
या वेळची निवडणूक सर्वार्थाने गाजली. मागील महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून भाजपाला मदत करणाऱ्या १२ नगरसेवकांना तिकीटा द्यायच्या की नाही या मुद्यावरून प्रचंड ओढाताण झाली. अखेर १२ पैकी फक्त तीन नगरसेवकांना आणि दोघांच्या पत्नीला तिकीटा देवून तडजोड करण्यात आली होती. रामू तिवारी यांना तिकीटात डच्चू मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी भाजपाकडून तिकीट मिळविले. प्रभाग क्रमांक १२ मधून रामू तिवारी आणि नंदू नागरकर एकमेकांविरूद्ध उभे असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे लागले होते. मात्र नागरकर यांनी तिवारी यांचा पराभव केला.
मागील वेळच्या १६ जागांवरून भाजपाने ३६ जागांवर मुसंडी मारली आहे. विद्यामन महापौैर राखी कंचर्लावार आणि त्यांचे पती संजय कंचर्लावार हे दोघेही भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागातील चारही जागासह बसपाने आठ जागांवर विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रहार संघटनेचे पप्पू देशमुख यांनी काँग्रेसचे कुशल पुगलिया यांचा पराभव केला. काँग्रेसचे नगरसेवक २६ वरून एकदम १२ वर घसरले आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात काँग्रेसची प्रथमच एवढी मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मागील टर्ममध्ये या पक्षाचे चार नगरसेवक होते. मात्र या वेळी ही संख्या दोनवर आली आहे. अभ्यासू नगरसेवक अशी ओळख असलेले संजय वैद्य यांचाही पराभव झाला. शिवसेनेने आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारात या निवडणुका लढल्या. मात्र या पक्षाला आपला प्रभाव येथे पाडता आला नाही. शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. मात्र या निवडणुकीत सेनेला तीन नगरसेवक गमवावे लागले आहेत. मनसेच्या मात्र दोन जागा मिळाल्या आहेत. तीन अपक्ष नगरसेवकही निवडून आले आहेत.
भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले असले तरी महापौरपद कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. या वेळी येथील महापौरपदाचे आरक्षण महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. विद्यमान महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह अंजली घोटेकर यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. असे असले तरी पक्षाकडून अधिकृतपणे कुणाच्याही नावासाठी दुजोरा मिळालेला नाही.
पक्षीय बलाबल
स्थिती २०१२
एकूण जागा : ६६
काँग्रेस : २६
भाजपा : १६
शिवसेना : ५
राष्टÑवादी काँग्रेस: ४
मनसे: १
बसपा: १
भारिप: १
अपक्ष : १२
स्थिती २०१७
एकूण जागा : ६६
भाजपा : ३६
काँग्रेस : १२
शिवसेना : २
राष्ट्रवादी काँग्रेस : २
मनसे: २
बसपा: ८
अन्य: ४