विनायक पात्रुडकरमुंबईच्या राजकारणात कायमच शिवसेनेच्या सावलीत वावरणारा, युतीतील धाकलेपणामुळे दबलेल्या-पिचलेल्या भाजपाने शिवसेनेचा मुंबईवरील एकछत्री अंमल संपुष्टात आणला आहे. मुंबईतील ३६पैकी १५ जागांवर भाजपाचे तर १४ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. आकड्यांच्या भाषेत दोन्ही पक्षांमध्ये अवघ्या एका जागेचे अंतर आहे. २००९ सालीदेखील भाजपाला शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त होती. पण, तेंव्हाचे यशही शिवसेनेचेच असल्याची भावना होती. या राजकीय धाकलेपणाला बाजूला सारत आज भाजपा मुंबईतील शक्तिशाली पक्ष म्हणून उदयास आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मराठी अस्मितेला हवा दिली. भाजपा, मोदी आणि गुजरातींना एका तागडीत घालून त्यावर जोरदार हल्ला चढविला. ही खेळी शिवसेनेला ४वरून १४ जागांवर घेऊन गेली. पण, याच खेळीने भाजपालाही यश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट, नवमतदारांवर असणारी त्यांची मोहिनी भाजपाच्या मदतीला आली. उत्तर भारतीय, गुजराती आणि भाजपाचा असा खास मराठी वर्ग कमळाच्या बाजूने राहिला. त्यामुळे केवळ आक्रमक मराठी अस्मितेच्या जोरावर यश मिळविता येणार नसल्याची बाब निकालांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे केवळ मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या मनसेला मुंबईत एकही जागा मिळाली नाही. शिवसेना-भाजपाच्या या संघर्षात काँग्रेस मात्र, थेट १७वरून ५वर आली. अनेक दिग्गज, मंत्रिपदावरील उमेदवारांनाही पराभव पत्करावा लागला. तर, राष्ट्रवादीला आपले खातेही उघडता आले नाही.
कमळाची पकड झाली घट्ट!
By admin | Published: October 20, 2014 5:09 AM