मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सरकारला अल्टीमेटम देऊन मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यातच शिवसेनेवर निशाणा साधण्यासाठी राज यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब भोंगा आणि रस्त्यावरील नमाजाविषयी बोलत आहेत. त्या व्हिडिओला शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी बाळासाहेबांच्या एक व्हिडिओने प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, "हा खरा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्वत नकलाकारांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे एक पाऊल मागे नाही, तर अनेक पावले मागे असतात." व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, 'मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमची शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता.'
राज ठाकरेंच्या व्हिडिओत काय ?राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर केला होता. 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात, 'ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील. धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.'
अजित पवारांचा राज ठाकरेंना सज्जड दमआज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना इशारा दिला. "जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल. यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी", असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.