अकोला: युसूफअली खदान परिसरातील एका प्रार्थनास्थळावर लावलेल्या ध्वनीक्षेपकावरून मोठय़ा आवाजात धार्मिक प्रार्थना करून ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २000 सहकलम १५ पर्यावरण अधिनियम १९८६ चे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी रविवारी दुपारी प्रार्थनास्थळाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सरकारतर्फे सहायक पोलीस निरीक्षक जी.वाय. कुंवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी पहाटे ४.४२ ते ४.५८ वाजताच्यादरम्यान युसूफअली खदान परिसरातील एका प्रार्थनास्थळावर लावलेल्या ध्वनीक्षेपकावरुन मोठय़ा आवाजात सकाळची प्रार्थना केली जात होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने, त्यांनी या प्रार्थनास्थळाच्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची ध्वनिमापन यंत्राद्वारे तपासणी केली असता, आवाजाचे प्रमाण हे ४५ डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचे असल्याचे जाणवले. पर्यावरण अधिनियम १९८६ आणि प्रदूषण नियम २000 नुसार निवासी क्षेत्रामध्ये ध्वनीची अनुट्ठोय र्मयादा (रात्री) ४५ डेसिबल असावी, असा नियम आहे. तसेच ध्वनी र्मयादेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे. या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाईसंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्याकडे निवेदन पाठविले. १५ दिवसांनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाल्यानंतर खदान पोलिसांनी रविवारी दुपारी प्रार्थनास्थळाचे अध्यक्ष अफसर खान शेरसेर खान यांच्याविरुद्ध ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २000 सहकलम १५ पर्यावरण अधिनियम १९८६ चे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे उल्लंघन केल्याने कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.
प्रार्थनास्थळावरील लाऊडस्पीकरचा आवाज ४५ डेसिबलपेक्षा जास्त!
By admin | Published: May 16, 2016 1:34 AM