- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निर्जनस्थळी बसलेल्या जोडप्यांना लुटणाऱ्या सराईतांनी लोणावळा येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा खून केला. चोरट्यांना प्रतिकार केल्यानेच हा खून करण्यात आला. यातील दोन्ही संशयित अटकेत असून, या गुन्ह्याच्या तपासात खबऱ्यांच्या जाळ्याचा चांगला उपयोग झाला, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’जवळील एका निर्जनस्थळी ३ एप्रिल रोजी सार्थक वाकचौरे (अहमदनगर) आणि श्रृती डुंबरे (ओतूर, जुन्नर) यांचे मृतदेह आढळले होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाळत ठेवून दोन महिन्यांनंतर संशयितांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्यातील आसिफ बादशहा शेख (२८, सध्या लोणावळा गावठाण, मूळ आग्रा) हा घटनेनंतर मूळ गावी पसार झाला होता. त्याला आग्रा येथे अटक करण्यात आली. तसेच सलिम उर्फ सँडी शब्बीर शेख (२२, रेल्वे पोर्टर चाळ, लोणावळा) हा प्रमुख संशयित असून, त्याला रविवारी अटक करण्यात आली. सलिम याच्यावर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्यात त्याला ४ महिने शिक्षाही झाली होती.घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी फौजदार प्रकाश शितोळे यांनी सलिमची चौकशी केली, मात्र त्याने दाद लागू दिली नाही. त्याने चोरलेले मोबाइल घराजवळ सेफ्टी टँकमध्ये फेकून दिले होते. त्याआधी मोबाइल दुरुस्ती करणाऱ्याला ईमआय नंबर काढून ते वापरात आणता येतील का, असे त्याने विचारले होते. हे मोबाइलही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.डोक्यात दगड घालून खूननिर्जनस्थळी बसलेल्या सार्थक आणि श्रुतीला चॉपरचा धाक दाखवून सलिम आणि आसिफ यांनी त्यांच्याकडून १ हजार रुपये आणि दोघांचे मोबाइल काढून घेतले. सार्थक याला विवस्त्र केल्यानंतर ते श्रुतीलाही विवस्त्र करू लागले. त्याला सार्थकने जबरदस्त प्रतिकार केला. त्या वेळी डोक्यात दगड घालून त्याला ठार करण्यात आले. श्रुतीने याची वाच्यता करू नये म्हणून सार्थकच्या शर्टच्या बाहीने तिचे हात मागे बांधण्यात आले आणि डोक्यात दगड घालून तिचाही खून करण्यात आला, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.