मुंबई : कॉम्प्युटर क्लासच्या शिक्षकावर प्रेम करणे एका विद्यार्थीनीच्या जिवावर बेतले. प्रेमाचा गैरफायदा घेत या शिक्षकाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यालाच कंटाळून या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी शंभू (२९) याला बुधवारी अटक केली आहे.घाटकोपर येथे १७ वर्षीय प्रिया (नावात बदल) कुटुंबियांसोबत राहते. बारावीतील प्रियाने त्याच परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून कॉम्प्युटर क्लास लावला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तेथील शिक्षकाने तिला प्रेमाच्या जाळ््यात ओढले. हेच प्रेमसंबंध तिच्या जिवावर बेतले. आरोपी शिक्षकाच्या मोबाइल फोनमध्ये असलेले फोटो डीलिट करण्यासाठी तिने त्याच्याकडे तगादा लावला होता. मात्र आरोपी तिचे फोटो डिलिट करत नव्हता. बदनामीच्या भीतीने प्रिया तणावाखाली होती. यातूनच तिने ३० जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दोन दिवसानंतर प्रियाच्या मोबाइल फोनमध्ये सापडलेल्या रेकॉर्डींगमुळे ही बाब उघड झाली. मुलीने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना ही बाब तिच्या वडीलांच्या निदर्शनास आली. या रेकॉर्डिंगमध्ये प्रिया आरोपीला आपले फोटो डिलीट करण्याबाबत सांगत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकावर प्रेम करणे जिवावर बेतले
By admin | Published: August 04, 2016 4:57 AM