ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १६ - लातूर येथे निर्जनस्थळी थांबलेल्या प्रेमी युगुलाला अमानूष मारहाण करणा-या तिघांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .हे तिघेही गनिमी कावा नामक संघटनेचे सभासद असल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबूक आणि वॉट्स अॅपवर एका प्रेमी युगुलाला तिघे जण शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडीओ फिरत होता. या व्हिडीओमध्ये तिघे तरुण त्या तरुणीला शिवीगाळ करत असून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणा-या प्रियकरालाही मारहाण केली गेली. संस्कृती रक्षकांच्या या गुंडगिरीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होता. या व्हिडीओतील पिडीत प्रेमी युगूलाने समोर येऊन मारहाण करणा-यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावे असे आवाहन सोशल मिडीयावरुन केले जात होते. संतापजनक बाब म्हणजे या कथित संस्कृती रक्षकांनी प्रेमी युगुलाच्या मारहाणीचा व्हिडीओ शूट करुन तो सर्वत्र पसरवला होता.
प्रसारमाध्यमांमध्ये हा व्हिडीओ झळकल्यावर राज्याच्या गृहखात्याला जाग आली व राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणाच्या पोलिस तपासाचे आदेश दिले. याप्रकरणी लातूर पोलिसांनी रात्रभऱ परिसरात शोधमोहीम राबवली. या दरम्यान व्हिडीओमध्ये मारहाण करणारे तिघे जण अंकोली गावातील असल्याचे पोलिसांना समजले आणि पोलिसांनी याा तिघांनाही ताब्यात घेतले. तर उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे.
काय आहे ही घटना ?
लातूरमधील अंकोली गावात राहणारे प्रेमी युगुल गावातील गेल्या वर्षी ३० नोव्हेंबररोजी निर्जनस्थळी थांबले होते. या दरम्यान गनिमीकावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले व त्यांनी प्रेमी युगुलाला चोप द्यायला सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडीओचे चित्रीकरणही करण्यात आले होते. यानंतर प्रेमी युगुलाने भीतीपोटी पोलिसांकडे तक्रारच दाखल केली नाही. मात्र सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रकाशित झाला आणि या गुंडांना तुरुंगाची हवा खावी लागली.