मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह आसपासच्या प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. परंतु कमी दाबाचे क्षेत्र असतानाही पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत नसल्याने मुंबई कोरडी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणासह मुंबईला पावसाचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात मात्र गेल्या २४ तासांत पावसाची एकही सर कोसळलेली नाही. सद्य:स्थितीमध्येही पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. येत्या २४ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. शिवाय बिहार, छत्तीसगड आणि गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशाचा उर्वरित भाग, झारखंड, विदर्भ, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागापासून परतलेल्या मान्सूनची सीमा शनिवारीही कायम आहे. तसेच म्यानमार आणि लगतच्या मिझोरम व त्रिपुराच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे.मुंबईमध्ये मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
कमी दाबाचे क्षेत्र कायम; पाऊस मात्र गायब
By admin | Published: October 11, 2015 1:54 AM