मुंबई : मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद आणि लगतच्या जिल्ह्यांचा यात समावेश असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान पुन्हा एकदा १५ अंशांवर नोंदवण्यात येत असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठरावीक शहरे गारठलेली आहेत.
मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहील आणि राज्यात पुढील ४, ५ दिवस फक्त सौम्य हिवाळा जाणवेल. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद होईल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान शास्त्र विभाग